![]()
सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द, धायरी आणि प्रेयेजा सिटी परिसरातील बेकायदेशीर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट त्वरित बंद करून महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवण्याची मागणी ‘सिंहगड रोड आरएमसी प्लांट विरोधी कृती समिती’ने केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. समितीच्या म्हणण्यानुसार, हे प्लांट प्रथम महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवावेत आणि त्यानंतर त्यांच्यासाठी नियमावली तयार करावी. नागरी वस्त्यांजवळ आरएमसी प्लांट नसावेत, अशीही त्यांची मागणी आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास, मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्याचा इशाराही समितीने दिला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी या प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करून ते स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला राजेंद्र पाटील, गणेश पिंपळे, लोकेश भावेकर, अॅड. प्रीतेश चांडगे, आनंद खळदकर, राहुल मांडे आणि सुयोग केळकर उपस्थित होते. वडगाव भागातील आरएमसी प्लांटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीचे साम्राज्य, श्वसनाचे विकार आणि अवजड वाहनांमुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजा सिटी, मधुकोष सोसायटी आणि परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांटमुळे हवेत सिमेंटची भुकटी सतत मिसळते. ही भुकटी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे गंभीर आजार जडले आहेत. सिमेंट वाहून नेणारे डंपर आणि मिक्सरमधून रस्त्यावर सिमेंट सांडल्याने हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे, असे समितीने सांगितले. प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम आणि आर्यन रेसिडेन्सी यांसारख्या सोसायट्यांमध्ये हजारो नागरिक वास्तव्य करतात. या भागातील रस्ते अरुंद असूनही आरएमसी प्लांटची अवजड वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. मोबाईलवर बोलत आणि मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालवणाऱ्यांमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मिक्सर वाहनाने एका पादचारी महिलेला चिरडले होते, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
Source link
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक:आरएमसी प्लांट बंद करा; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा