Headlines

पुण्यात कारच्या काचा फोडून चोऱ्या करणारा गुन्हेगार जेरबंद:12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीवर 100 हून अधिक गुन्हे दाखल




पुण्यात कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. राजू बाबूराव जवळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १२ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करत असे. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कारच्या काचा फोडून चोरीचे सहा गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राजू जवळकर याला ताब्यात घेतले. सुरुवातीला जवळकरने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सखोल चौकशीअंती त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे शहर, ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि पिंपरी चिंचवड येथे १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९७.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, ३ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली ज्युपिटर मोपेड असा एकूण १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, गुन्हे निरीक्षक स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *