![]()
पूर्व प्रेयसी आणि तिच्या बहिणीने खोट्या पोलिस केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याने वांद्रे येथील एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या १३ व्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ६ ऑगस्ट रोजी तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण वांद्रे (पूर्व) येथे त्याचे आई-वडील आणि लहान भावासोबत राहायचा. त्याने यापूर्वी एका न्यायाधीशांकडे विधी सहायक (लॉ क्लार्क) म्हणून काम केले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, हा तरुण गेल्या काही दिवसांपासून तणावात आणि नैराश्यात होता. ६ ऑगस्ट रोजी त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या आईला फोन करून सांगितले की, बेंगळुरूमध्ये शिकत असताना त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. नंतर त्यांचे संबंध बिघडले आणि पूर्व प्रेयसी व तिच्या मोठ्या बहिणीने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली, असे त्यांनी या वेळी सांगितले. स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले आणि खिडकीतून उडी मारली : आईने याबाबत विचारणा केली असता त्या तरुणाने आपल्याला धमकी दिली जात असल्याची कबुली दिली. त्याची आई त्याच्या मित्राशी फोनवर बोलत असतानाच त्याने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले आणि खिडकीतून खाली उडी मारली. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले.
Source link
पूर्व प्रेयसीने दिली धमकी; मुंबईत तरुणाची आत्महत्या:गुन्हा दाखल, 13 व्या मजल्यावरून घेतली उडी