![]()
राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता ‘सहकार’ खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ ‘कॅबिनेट दर्जा’ हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत,” अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगत सहकार क्षेत्रातील आगामी बदलांची माहिती दिली. नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. ते म्हणाले, “प्रवीणजींच्या नावासमोर सध्या कॅबिनेट दर्जा आहे, पण आमची प्रार्थना आहे की हा केवळ ‘दर्जा’ शब्द लवकरात लवकर जावा आणि त्यांना प्रत्यक्ष सहकार मंत्रिपद मिळावे.” या विधानाने सभागृहात कुजबुज सुरू होताच, पाटील यांनी मिश्किलपणे सावरून धरले की, “भाषणात ओघाओघाने असं बोलावं लागतं.” अमित शाहांचा ‘तो’ किस्सा आणि सहकार खाते सहकार मंत्री म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अमित शाह यांच्यामुळेच मी आधी आमदार आणि नंतर मंत्री झालो. त्यांनीच मला पहिले सहकार खाते दिले. त्यावेळी माझी साधी सहकारी संस्थाही नव्हती. मी त्यांना विचारले की मलाच हे खाते का? तेव्हा शाह म्हणाले, तुमच्या स्वतःच्या संस्था नाहीत, म्हणूनच तुम्हाला हे खाते दिले आहे, जेणेकरून तुम्ही निष्पक्षपणे काम करू शकाल.” स्वतंत्र सहकार विद्यापीठाची घोषणा सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. “राज्यात लवकरच एक स्वतंत्र ‘सहकार विद्यापीठ’ निर्माण करण्यात येईल. तसेच, राज्यातील इतर विविध विद्यापीठांमध्ये ‘सहकार’ नावाचे स्वतंत्र विभाग सुरू केले जातील,” अशी महत्त्वाची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला कामासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल, त्यांनी फक्त ठोस प्रस्ताव पाठवावेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांचे ‘त्या’ फाईलसाठी प्रयत्न आमदार सुनील कांबळे यांच्या सहकार सूत गिरणीचा संदर्भ देत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “कांबळे यांच्या गिरणीची फाईल मंजूर व्हावी यासाठी देवेंद्रजींनी संपत आलेली कॅबिनेट बैठक केवळ त्या कामासाठी लांबवली आणि फाईल मंजूर करून घेतली,” असे सांगत त्यांनी सरकारमधील समन्वयाचे उदाहरण दिले. कर्जबाजारीपणाची टीका चुकीची, राज्याचा GDP भक्कम राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. “विरोधक कितीही टीका करत असले तरी राज्य सरकार कर्जबाजारी नाही. राज्याचा जीडीपी (GDP) अत्यंत चांगला असून परिस्थिती नियंत्रणात आहे,” असे ते म्हणाले.
Source link
प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर