![]()
संपूर्ण राज्यात गाजलेल्या यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या २४२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात ईडीच्या पथकाने गुरुवारी यवतमाळ आणि वणी शहरात ९ ठिकाणी छापेमारी केली. बँकेचे थकीत कर्जदार, मूल्यांकन अधिकारी, संचालक आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कंचलवार यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले. दोन इनोव्हा वाहनांतून आलेल्या या पथकात महिला अधिकारी व सशस्त्र सुरक्षा जवानांचा समावेश होता. सकाळी ६ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यातील एका पथकाने वणी येथील नीलकंठ-मालती अपार्टमेंटमध्ये राहणारे मेडिकल व्यावसायिक रवींद्र दामोदर येरणे यांच्या फ्लॅटवर छापा मारून तब्बल सात तासांहून अधिक काळ कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी केली. तालुकास्तरावर थेट ईडीने धाड टाकल्याने आणि तब्बल १७,००० खातेधारकांचे पैसे अडकलेल्या या प्रकरणात थेट कारवाई झाल्याने सर्व थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. पोलिस, उपनिबंधक कार्यालय अनभिज्ञ विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईसंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. तसेच सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांशीही संपर्क न साधता, इतर कोणत्याही विभागाला सहभागी न करून घेता ईडीने ही कारवाई गुप्तपणे पार पाडली. संबंधित यंत्रणेकडून या कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. दरम्यान, घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयच्या निर्देशानुसार बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) म्हणून जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली होती.
Source link
बाबाजी दाते महिला बँकेत 242 कोटींचा अपहार:‘ईडी’चे यवतमाळ, वणीत धाडसत्र, सकाळी 6 पासून सुरू झालेली झाडाझडती सायंकाळपर्यंत होती सुरू