![]()
व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीचा संकल्प घेऊन वारी परिवार सायकल क्लब, मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळवेढा ते कन्याकुमारी ही १,३५० किलोमीटरची व्यसनमुक्ती जनजागृती सायकल यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून प्रवास करत मंगळवेढ्यातील सायकलपटूंनी कन्याकुमारी गाठत जिद्द, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाचे मध्य प्रदेशचे राज्य सहकारी अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री सावन सोनकर आणि कन्याकुमारीचे माजी आमदार एम. गांधी यांनी कौतुक करून सर्व रायडर्सचा सन्मान केला. दि. १२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढ्यातील शिवतीर्थावरून उत्साहात सुरू झालेली ही यात्रा २२ नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथे पोहोचली. ‘एक पाऊल व्यसनमुक्तीकडे’ हा संदेश घेऊन निघालेल्या सायकलपटूंनी विजापूर, आलमट्टी, इरकल, होसपेट, चित्रदुर्ग, तुमकूर, होसूर, सेलम, वेदासुंदर, विरुधुनगर आणि तिरुनेलवेली मार्गे प्रवास करत ठिकठिकाणी व्यसनमुक्तीचा जागर केला. १,३५० किलोमीटरचा हा प्रवास केवळ अंतर पार करण्यापुरता मर्यादित नव्हता. बदलते हवामान, लांबचा रस्ता, शारीरिक थकवा आणि विविध आव्हानांवर मात करत अंतर पार केले. या व्यसनमुक्ती जनजागृती सायकल यात्रेत शरद हेंबाडे, विठ्ठल बिले, सागर लंगोटे, प्रा. महेश अलिगावे, नागेश डोंगरे, राहुल सावंजी, डॉ. राहुल शेजाळ, दत्ता जाधव, प्रफुल्ल सोमदळे, आयुष गवळी, दिलीप आडसुळ, फारुख मुजावर आणि प्रा. विनायक कलुबर्मे यांनी सहभाग घेतला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमभूमीत या यात्रेची यशस्वी सांगता झाली. यावेळी स्वामी विवेकानंद स्मारकासह ऐतिहासिक स्थळांना भेट देत सायकलपटूंनी आनंद व्यक्त केला.
Source link
मंगळवेढ्याच्या सायकलस्वारांनी 1,350 किमी अंतर पार करत गाठली कन्याकुमारी:वारी परिवाराकडून 10 दिवसांच्या प्रवासामध्ये व्यसनमुक्तीचे धडे