![]()
प्रतिनिधी | कोरडगाव ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून खासगी शाळांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘पुरस्कार सोहळा’ गावात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप मुखेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे कृषी अधिकारी पवनकुमार नजन उपस्थित होते. मुख्याध्यापिका जयश्री बोरुडे आणि मार्गदर्शक शिक्षक दादासाहेब कचरे यांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. “यश ही एका दिवसाची कमाई नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांची साठवण आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. या सोहळ्यात इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. यात हर्षवर्धन मुखेकर: ९०% (मिशन आरंभ), प्रणाली मुखेकर: ९१.३३%, प्रतीक घुले: स्टुडंट टॅलेंट परीक्षेत तालुक्यात प्रथम, श्रावणी गणेश मुखेकर (८८%), श्रावणी तात्यासाहेब मुखेकर (८५.३३%) आणि आदित्य मुखेकर (८७%) यांनीही चमकदार कामगिरी केली. वेदिका देशमुख व आयुष काकडे यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेचे नाव उंचावले.स्मार्ट क्लासरूम, दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यामुळे आता ग्रामीण पालक पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागले आहेत. मुखेकरवाडीचा निकाल हा या बदलाचा जिवंत पुरावा आहे. यावेळी मेजर नागनाथ मुखेकर, सरपंच रवींद्र मस्के, विकास मुखेकर यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
‘मिशन आरंभ’ आणि ‘जी-टेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांचा डंका; प्रतिकूल परिस्थितीतही मिळवले यश:मुखेकरवाडी जि.प. शाळेच्या चिमुरड्यांची स्पर्धा परीक्षेत भरारी