Headlines

मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याची गरज:डॉ. नितीन करमाळकर यांचे मत; डॉ. भूषण पटवर्धन लिखित ‘काऊ फॉर चिल्ड्रन’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन




पुण्यातील कोंढवा येथील इस्कॉन मंदिरात डॉ. भूषण पटवर्धन लिखित ‘काऊ फॉर चिल्ड्रन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी यावेळी सांगितले. भारतीय सण-उत्सव केवळ साजरे न करता, त्यामागील उद्देश, परंपरा आणि संस्कार मुलांना समजावून सांगावेत, असे करमाळकर म्हणाले. सणांचे शास्त्रीय, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व मुलांना कळल्यास भारतीय संस्कृतीची मुळे त्यांच्या मनात खोलवर रुजतील, असेही त्यांनी सांगितले. पुस्तक प्रकाशनावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य संजय भोसले, मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, सर्वलक्षण प्रभू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे हरीश नवले, जनार्दन चितोडे, भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे बलभद्र कृपा प्रभू आणि केंद्राचे संचालक के. एन. धुमाळ उपस्थित होते. करमाळकर म्हणाले, बालवयात मिळालेले संस्कार मुलांच्या मनावर खोलवर ठसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. याच विचारातून डॉ. भूषण पटवर्धन यांनी मुलांना गोमातेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुस्तक लिहिले आहे. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, भारतीय समाजाने गाईला केवळ पशू न मानता कुटुंबाचा भाग मानले आहे. भारतीय संस्कृतीत गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. गाईचे वैज्ञानिक, सामाजिक आणि इतर महत्त्व मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत पुस्तकात मांडले आहे. लहान वयात मुलांना गाईचे महत्त्व समजल्यास भारतीय संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाईल, असे त्यांनी सांगितले. संजय भोसले यांनी शाळांमध्ये गो-पर्यटन सुरू करण्याची सूचना केली. मुलांनी गोशाळांना भेट दिल्यास त्यांना गाईचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता येईल, असे ते म्हणाले. मंदिरांमध्ये गोशाळा सुरू केल्यास गोमातेचे संरक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. जनार्दन चितोडे म्हणाले, या पुस्तकामुळे मुले भारतीय संस्कृतीशी जोडली जातील. मोबाईल, व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या काळात मुलांचे लक्ष डिजिटल माध्यमांकडे अधिक आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीकडे त्यांचे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *