- Marathi News
- National
- SP BJP Did Not Give Share To Muslims Asaduddin Owaisi, Politics Heated Up Over Constitution Day
लखनऊकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संविधान दिनानिमित्त गुरुवारी लखनऊमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम आणि तरुण दलित नेते चंद्रशेखर यांच्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्या ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ या आघाडीची पहिली संयुक्त सभा पार पडली. या सभेत ओवेसी म्हणाले की, भाजप व सपा संविधानाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. सपावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले की, हा पक्ष जातीवर आधारित राजकारण करतो. मुस्लिमांकडे मते मागतो, पण त्यांना प्रतिनिधित्व देत नाही. या आघाडीने आझाद यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
मुस्लिम, मागासवर्गातून दोन उपमुख्यमंत्री:आघाडी सत्तेत आल्यास मुस्लिम समाज आणि मागासवर्गातून दोन उपमुख्यमंत्री केले जातील, असे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.
मोदी-ज्ञानेश यांच्या संगनमताने निष्पक्ष निवडणुका अशक्य : खरगे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लखनऊमध्ये संविधान संरक्षण मोर्चाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशात मुक्त व निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. त्यांनी आरएसएस व भाजपवर १२ वर्षांपासून संविधान कमकुवत केल्याचा व द्वेष पसरवल्याचा आरोप केला. दुसरीकडे, विरोधक अराजकता पसरवत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी केला.
पंजाबमध्ये आपची महारॅली, सर्व आश्वासने पूर्ण : केजरीवाल
पंजाबमधील मोगा येथे आम आदमी पक्षाने ‘खुशहाल पंजाब महारॅली’ आयोजित केली. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सीएम मान यांच्या नावावर मते मागितली. मान सरकारने सर्व आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला.

अखिलेश यादव यांच्याकडून ‘प्रणपत्र’ जाहीर
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी यूपी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे पहिले ‘प्रणपत्र’ जाहीर केले. यामध्ये ५ वर्षांत २५ लाख सरकारी नोकऱ्या आणि इतर क्षेत्रांत २ ते ३ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत १० लाख सरकारी पदे भरण्याचा निर्णय घेण्यात येईल. जातनिहाय जनगणना करणार असल्याचेही सांगितले. अखिलेश म्हणाले की, ‘योजनांवर वार्षिक सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. निधीची तरतूद कशी करायची, याचा तपशील तयार आहे.’