Headlines

लग्नात दिले 50 तोळे सोने:दर दिवाळीला मागायचे 10 तोळे सोने;पुण्यात इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या, संतप्त नातेवाइकांची झांबरे पॅलेसमध्ये तोडफोड




मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्यांकडून होणारा छळ, लग्नात ५० तोळे सोने व २५ लाख रुपये देऊनही दर दिवाळीला १० तोळे सोने व सणासुदीला सोन्या-नाण्याची सतत होणारी मागणी आणि जमिनीच्या वादातून त्रस्त झालेल्या ३४ वर्षीय संगणक अभियंता विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने भावाला ‘माझी सासू जबाबदार आहे’ असा मेसेज पाठवला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल अक्षय झांबरे (३४, रा. झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर, पुणे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीसह सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल याप्रकरणी तिचा भाऊ ऋषीकेश रवींद्र पवार (३१, रा. खेड शिवापूर, जि. पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३८), सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८), सासरे अरविंद झांबरे (वय ६५) आणि नणंद अक्षता अरविंद झांबरे/निमन (वय ३०) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली आहे. ‘मुलगाच हवा’चा आग्रह; मुलीच्या जन्मानंतरही छळाचा आरोप: पायल गर्भवती असताना तिचा पती, सासू आणि सासरे यांनी ‘आम्हाला मुलगाच हवा’ असा आग्रह धरून तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे गर्भावस्थेत ती सतत दडपणाखाली आणि भीतीमध्ये राहत होती, असा आरोप तिच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या जबाबात केला आहे. सोन्यासाठी आमच्या लेकीचा बळी घेतला : चुलते जनार्दन पवार पायलच्या चुलत सासूने फोन करून ती गेल्याचे सांगितले. आम्ही तातडीने धाव घेतली, तेव्हा आमची मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती. लग्नापासूनच तिला सोन्यासाठी छळले जात होते. आम्ही दर दिवाळीला १० तोळे सोने देत आलो. यंदा परिस्थिती अडचणीची असल्याने तिने हात जोडून ‘पुढच्या वर्षी देते’ अशी विनंती केली होती. पायलच्या लग्नात ८० लाख रुपये खर्च केले होते. घटनास्थळावरील तणाव आणि पोलिसांचा फौजफाटा पायलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मुकुंदनगर परिसरासह झांबरे पॅलेसबाहेर नातेवाइकांची मोठी गर्दी जमली. संतापाच्या भरात काहींनी झांबरे पॅलेसच्या दिशेने तुफान दगडफेक केली. परिसरातील वाहनांचे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्वारगेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *