Headlines

लग्नापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला:भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर




जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात, होणाऱ्या नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर अशी मृतांची नावे असून, या अपघातात शिखाचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. कारचे टायर फुटल्यानंतर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याखालील झाडावर जोरात आदळले. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अत्यंत हृदयद्रावक बाब म्हणजे, मयत शिखाचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता आणि येत्या 8 मे रोजी तिचे लग्न नियोजित होते. लग्नाची पहिली पत्रिका वणी येथील सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेऊन परतत असतानाच बांबरुड जवळ हा काळाचा घाला पडला. ज्या घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे या भीषण अपघातामुळे शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाशिममध्येही भीषण अपघात, कंटेनरखाली दबून चालकाचा मृत्यू वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शेवदी फाट्यावर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्याहून कारंजाकडे येत असलेल्या एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. या भीषण अपघातात चालक कंटेनरखाली दबला गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला सारून चालकाचा मृतदेह बाहेर काढला. सुनील विष्णू पवार (वय 48, रा. सोनोशी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे सिंदखेड राजा परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *