Headlines

लिंबाळे शंभरावे अध्यक्ष!:पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड




पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आज मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली. प्रकाशक आणि लेखक बाबा भांडे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अखेर लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यात झालेल्या बैठकीत दुष्काळामुळे संमेलन साधेपणाने घ्यावे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर आज लिंबाळे यांची निवड झाली. ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने डॉ. लिंबाळे यांना मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख मिळवून दिली. ‘द आऊटकास्ट : अक्करमाशी’ या नावाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि या साहित्यकृतीचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सहभाग झाला आहे. ‘सनातन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘रामराज्य’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘दलित पँथर’, ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ अशा विविध साहित्यकृतींमधून त्यांनी जात, अस्मिता, सामाजिक विषमता, इतिहास आणि माणसाच्या जगण्याचे प्रश्न मांडले आहेत. अनुभवातून आलेले लेखन आणि सामाजिक वास्तवाकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी ही त्यांच्या साहित्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची चाळीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून दिलीपराज प्रकाशनतर्फे त्यांचे ‘दलित फाईल्स’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. “४४ प्रकाशित पुस्तकांचा साहित्यप्रवास असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, इंग्रजीसह मल्याळम, तमिळ, कन्नड, पंजाबी, गुजराती आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. २०११ मध्ये १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि २०१९ मध्ये प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार त्यांना लाभला. तसेच ‘सनातन’ या कादंबरीसाठी २०२० सालचा सरस्वती सन्मान हा त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा गौरव ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *