Headlines

वसमत तालुक्यात थरार:मुलाचा पत्ता न सांगितल्याने वडिलांना मारहाण, दुचाकी पळवली; 9 जणांवर गुन्हा




वसमत तालुक्यातील पळशी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा पत्ता विचारण्यासाठी आलेल्या तब्बल नऊ जणांच्या टोळक्याने मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने घरासमोरील दुचाकीची तोडफोड करत एक दुचाकी पळवून नेली तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळशी येथील रहिवासी लिंबाजी एंगडे हे आपल्या घरी काम करत होते. रविवारी पूर्णा तालुक्यातील बरवडी येथील नऊ जण त्यांच्या घरी धडकले. त्यांनी लिंबाजी यांच्याकडे “तुमचा मुलगा कुठे आहे?” अशी विचारणा केली. लिंबाजी यांनी “मला मुलगा कुठे आहे याची माहिती नाही,” असे सांगताच आरोपींचा पारा चढला. संतापलेल्या या नऊ जणांनी लिंबाजी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी घरात घुसून मुलाचा शोध घेतला, मात्र मुलगा तिथे आढळून आला नाही. बाहेर पडताना आरोपींनी राग अनावर झाल्याने घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड केली आणि दुसरी एक दुचाकी पळवून नेली. या काळात आरोपींनी पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळही केली. आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना या घटनेनंतर पीडित लिंबाजी एंगडे यांनी तात्काळ हट्टा पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली व तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवनाथ भवरे, अविनाश भवरे, जगन्नाथ भवरे, वैजनाथ भवरे, अष्टविनायक शिंदे यांच्यासह इतर चार अनोळखी अशा एकूण 9 जणांवर जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण, तोडफोड आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकर आणि पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने पळशी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली असून अधिक तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *