![]()
येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (आय.एम.एस.सी.डी.आर.) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. हातिम कय्यूमी आणि ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याची शपथ घेतली. प्रा. तृप्ती कोठारी यांनी इंग्रजी भाषेत, तर प्रा. अजित कुटे यांनी हिंदी भाषेत राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. विविधतेचा आदर, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून आयएमएसच्या ग्रंथालयातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना त्यांचे नेतृत्व, संस्थानांच्या विलीनीकरणातील ऐतिहासिक भूमिका आणि भारताच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेले योगदान जाणून घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार वाचन आणि अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील हेतू होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती माळशे आणि ऐश्वर्या राऊत यांनी केले. या उपक्रमाला प्रा. गौरी पाटील, प्रा. श्रुती राव आणि प्रा. सायली तोरणे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. प्रणोती तेलोरे आणि उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस यांनी विद्यार्थी समिती तसेच आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यालय अधीक्षक महेश दीक्षित, लेखापाल नरेंद्र कदम, ग्रंथालय कर्मचारी जितिन आढाव, सिराज मुलाणी, विजय पाटोळे तसेच विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी उपस्थित होते.
Source link
विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ