Headlines

शालेय विद्यार्थ्यांनी तयार केले पर्यावरणपूरक आकाशकंदील:विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश




दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील टाकळीमानूर येथील श्री भवानी माता विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला चालना देत विविध आकारांचे, रंगसंगतीचे आणि आकर्षक सजावटीचे आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या आकाशकंदिलांसह सुबकपणे सजविलेल्या पणत्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कलात्मकता, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून मनमोहक आकाशकंदील तयार केले. आकर्षक रंगसंगती, विविध आकार आणि कलाकुसरीमुळे प्रत्येक आकाशकंदील वैशिष्ट्यपूर्ण ठरत होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट आकाशकंदील बनविण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कलाकृती इतरांपेक्षा वेगळी आणि अधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला. विद्यालयात मांडण्यात आलेल्या आकाशकंदील आणि सजविलेल्या पणत्यांच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण परिसराला दिवाळीचे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून शिक्षकांनी त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या या कलाकृती केवळ सजावटीपुरत्या मर्यादित न राहता पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची प्रेरणा देणाऱ्या ठरल्या. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेला चालना मिळाली. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या आकाशकंदील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कलाकृती सादर केल्या. स्पर्धेत अक्षदा धोंडीराम मासाळ हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रसाद गाडे याने द्वितीय आणि अंकिता नगरकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील विशेष आकर्षण ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शिक्षकांनी कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य देविदास सोनटक्के यांच्या प्रेरणेतून आणि कलाशिक्षक निलेश गणगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्राचार्य देविदास सोनटक्के, कलाशिक्षक निलेश गणगले, प्रवीण गावडे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *