![]()
शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसाय आणि अनेकविध कारणांनी माणसाला आपले गाव सोडावे लागते. मात्र, शहरात राहूनही आपल्या मूळ गावाशी असलेले नाते कधीच तुटत नाही; प्रत्येकाने आपल्या गावाशी असलेले हे ऋणानुबंध कायम जपून ठेवावेत, असे प्रतिपादन विजय अंबादास जोशी यांनी हतनूर ग्रामस्थांच्या स्नेहमेळाव्यात केले. कन्नड तालुक्यातील हतनूर गावातून छत्रपती संभाजीनगर शहरात स्थायिक झालेल्या ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी हतनूरकर मित्रमंडळाने या स्नेहसंमेलनाचा पुढाकार घेतला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्यात जुन्या-नव्या हतनूरकरांचा परस्परांशी परिचय होऊन जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. यावेळी विजय जोशी म्हणाले की, एकाच शहरात राहूनही व्यस्ततेमुळे परस्परांना भेटता येत नाही; परंतु व्हॉट्सॲप ग्रुप आणि या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ एकत्र आले, हा अत्यंत अविस्मरणीय क्षण आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंत अकोलकर, कैलास रहातेकर, श्याम कुलकर्णी आणि लोखंडे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी बापूसाहेब चव्हाण, दिलीप अकोलकर, बाळासाहेब कंचार, नितीन जैन, कैलास कदम, संतोष पांडे, राजू भोसले, राजेंद्र केरे, संजय कुलकर्णी, रामचंद्र काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
शहरामध्ये येऊनही आपल्या गावाशी ऋणानुबंध जपून ठेवा- विजय जोशी:संभाजीनगरला कार्यक्रम, हतनूर ग्रामस्थांच्या स्नेहमेळाव्यात जागवल्या आठवणी