![]()
दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी गव्हाली तांडा (ता. कन्नड) येथे केले. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घरी जाऊन मंत्री अतुल सावे यांनी शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे मंत्री सावे यांनी कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील विठ्ठल धुमा चव्हाण आणि धनगरवाडी येथील रामकृष्ण वाघचौरे यांची भेट घेऊन त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी रामेश्वर वाघमारे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे सांत्वन केले. कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण शिक्षणाचा खर्च वैयक्तिकरीत्या उचलण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तसेच दिवाळीनिमित्त कुटुंबीयांना फराळाचे वाटप करून त्यांच्या सणाच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य डॉ.संजय गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, जिल्हा परिषद सदस्य मंजूषा मलदोडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश घुले, जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, राजेश बनकर, ललित सुराशे, सुनील निकम, महेश मलदोडे, विलास भोजने, बाबासाहेब काळे, सुदाम पवार, गणेश चव्हाण, शशिकांत नागरे, विलास पवार, राजू भोजने, भरत जाधव, ज्ञानेश्वर काळे आदी पदाधिकारी हजर होते.
Source link
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून खचून जाऊ नये- मंत्री सावे