Headlines

शिवना येथे 160 मुलींना युद्धकलेचे प्रशिक्षण:तलवारबाजी, दांडपट्टा अन् लाठीकाठीने गाजतेय शाळेचे मैदान




सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेचे मैदान सध्या तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठीच्या खणखणाटाने गाजत आहे. निमित्त आहे शिवकालीन युद्धकला मोफत प्रशिक्षण शिबिराचे. गंगापूर येथील प्रशिक्षक शरद पाटील यांच्याकडून १६० मुलींना या पारंपरिक युद्धकलेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून, प्रात्यक्षिके करताना मुलींमध्ये प्रत्यक्ष रणरागिणी संचारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे विद्यार्थी इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शालेय जीवनात अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी, सामाजिक व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलींमध्ये आत्मसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी, या उदात्त उद्देशाने स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेचे सचिव दिलीप काळे यांनी या शिबिराचे विशेष आयोजन केले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात परिसरातील विविध शाळांमधील १६० हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. मैदानी खेळांसोबतच शिवकालीन युद्धकलेचे चित्तथरारक आणि कठीण डावपेच मुली अत्यंत आत्मविश्वासाने आत्मसात करत आहेत. शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षक शरद पाटील यांनी या उपक्रमाविषयी सांगताना स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शौर्य, स्वराज्य आणि स्वसंरक्षणाचा महान आदर्श दिला आहे. शिवकालीन युद्धकला विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शिस्त आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण करते. आजच्या काळात मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने मी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देत आहे. आतापर्यंत राज्यभरात ७३ शिबिरे घेण्यात आली गेल्या चार वर्षांपासून मी या कार्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतले असून, आतापर्यंत राज्यभरात ७३ शिबिरे यशस्वीरीत्या पार पडली आहेत. तसेच आगामी जून महिन्यापर्यंत अखंडित शिबिरांचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे शरद पाटील यांनी सांगितले. शाळेच्या मैदानावर मुलींचा हा उत्साह, शिस्त आणि शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व पालकांचीही मोठी गर्दी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *