Headlines

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाद प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यामुळे संताप:आंबी कुटुंबीय आक्रमक, आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार




शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी तो केवळ अदखलपात्र, स्वरूपात नोंदवण्यात आल्याने आंबी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादाची सुरुवात एका ऑडिओ क्लिपमुळे झाली. सुमारे 38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आणि कोल्हापूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार शेकडो कार्यकर्त्यांसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर डाव्या विचारांच्या संघटनांनी पुस्तकाचे जाहीर वाचन करून निषेध नोंदवला. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आंबी कुटुंबीयांनी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी केली असताना सौम्य कलमांखाली गुन्हा नोंदवल्याने संताप वाढला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेणार या पार्श्वभूमीवर आंबी कुटुंबीय आणि विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आता अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, यासाठी पुढील पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी न्याय मिळवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, आज आंबी कुटुंबीय आणि कार्यकर्ते अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपली भूमिका मांडून गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, आणि पोलिसांची भूमिका बदलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *