![]()
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गोरख पातळे (26) या शेतकऱ्याने विहीरीचे अनुदान भरण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याने बुधवारी ता. 15 शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा मगच मृतदेह खाली काढा अशी भूमिका गोरख यांचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली. मात्र रात्री आठ वाजता झालेल्या चर्चेनंतर सात तासांनी मृतदेह खाली उतरविण्यात आला. दरम्यान, मयत गोरख यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. आज सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र गावकरी व मयत गोरख यांच्या कुटुबियांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा मगच उत्तरीय तपासणी करा अशी भुमीका कायम असल्याने पोलिस यंत्रणा देखील हतबल झाली आहे. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, प्रविण महाजन, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन मयत गोरख यांच्या कुटुंबियांची तसेच गावकऱ्यांची भेट घेतली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत उत्तरीय तपासणीचा तिढा सुरुच होता. त्यामुळे मागील 21 तासापासून मृतदेह उत्तरीय तपासणीच्या प्रतिक्षेत आहे. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
Source link
शेतकरी गोरख पातळे आत्महत्या प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करा, मगच पोस्टमार्टम, पातळे कुटुंबासह गावकऱ्यांचा गोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या