![]()
आदिशक्ती संत मुक्ताईचा ३१८ वा आषाढी वारी पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघ्या तीन दिवसांत संत मुक्ताईंची पालखी विठुरायाच्या पवित्र पंढरीत दाखल होईल. २४ जून रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून चांदीच्या रथात संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुका घेऊन प्रस्थान केलेला हा सोहळा भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देत सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत सध्या धाराशिव जिल्ह्यातून पुढे सरकत आहे. १७ जुलैला पालखीचा मुक्काम भूम शहरात झाला. यावेळी दरवर्षीप्रमाणे संत मुक्ताई पालखीभोवती मेंढ्यांचे पारंपरिक गोल रिंगण मोठ्या भक्तिभावाने पार पडले. ही आगळीवेगळी धार्मिक परंपरा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल-मुक्ताईच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात संपूर्ण भूम शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. १८ जुलै रोजी पालखीचा दुपारचा विसावा आष्टी येथे झाला. समस्त ग्रामस्थांच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. त्यानंतर पालखी जवळा येथे मुक्कामासाठी दाखल झाली. येथेही ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या भोजन व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करून वारकरी सेवेची परंपरा जपली. १९ जुलैला पालखीचा दुपारचा विसावा वाकडी येथे होईल. ग्रामस्थांच्या वतीने वारकरी व भाविकांना भोजन देण्यात येईल. त्यानंतर पालखी शेंद्री गावाकडे मार्गस्थ होईल. रात्रीचा मुक्काम तेथे होईल. शेंद्री येथील ग्रामस्थही वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करणार आहेत. यामुळे संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा संपूर्ण मार्गावर भक्तीचा अखंड महोत्सव ठरत आहे. आता वारकऱ्यांच्या नजरा विठुरायाच्या भेटीकडे लागल्या असून अंतिम टप्प्यातील ही वाटचाल अधिकच भावपूर्ण बनली आहे. दरम्यान, या प्रवासात वारकरी पावसासाठी साकडे घालत आहेत. २२ जुलैला संत मुक्ताई पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. दुपारी ४ वाजता संत नामदेव महाराजांचे आजेगुरू संत मुक्ताबाई पालखी सोहळा भेट पार पडणार आहे. त्यानंतर पादुकांना चंद्रभागा नदीत विधिवत स्नान घातले जाईल. चंद्रभागा स्नानानंतर पालखीचा पंढरपूरमध्ये प्रवेश होऊन दत्तघाट येथील संत मुक्ताबाई मठात पालखीचा मुक्काम आषाढी वारीपर्यंत राहणार आहे. २२ जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार
Source link
संत मुक्ताई पालखी तीन दिवसांत भूवैकुंठ पंढरपुरात होणार दाखल:आष्टी-जवळा मुक्कामानंतर आज शेंद्रीकडे वाटचाल