![]()
जमीन खरेदीच्या नावाखाली १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने कुटुंबासह हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुमक मागवून या गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने बाप-लेकाची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. अर्जुन ऊर्फ बंडू सखाराम तांबे, त्याचा मुलगा सोपान अर्जुन तांबे (दोघे अटकेत), पत्नी सुरेखा आणि मुलगी उमा (सर्व रा. मुकुंदनगर, रेल्वे गेट क्र. ५६ जवळ) अशी आरोपींची नावे आहेत. अर्जुन तांबे आणि त्याची पत्नी सुरेखा यांनी जयभवानीनगर येथील एका महिलेला सांजखेडा येथील एक शेतजमीन दाखवली होती. मूळ मालक म्हणून तांबे दांपत्याने एका तोतया महिलेला आणि तिच्या पुतण्याला उभे केले. या बोगस मालकांसोबत बनावट इसारपावती करून महिलेकडून १८ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. फसवणूक उघड झाल्यानंतर पैसे परत मागितले असता फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. या गुन्ह्यात तो पसार झाला होता. इनसाइड स्टोरी अर्जुन ऊर्फ बंडू तांबे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रत्यय एका घटनेवरून येतो. या गुन्हेगाराने मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकाला फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. ‘तुझा मर्डर करतो,’ असे म्हणत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. तांबेने आता गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला करून पुन्हा एकदा कायद्याला आव्हान दिले आहे. कुटुंबातील सदस्यांनीही
केली पोलिसांना मारहाण रात्री पावणेनऊच्या सुमारास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाला अर्जुन मुकुंदनगर येथील घरी असल्याची माहिती मिळाली. हवालदार श्रीकांत काळे आणि अंमलदार मनोहर गिते त्याला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. पोलिसांना पाहताच अर्जुनने शिवीगाळ सुरू केली आणि घरासमोरील पत्र्याच्या शेडमधून लोखंडी टिकाव हवालदार काळे यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. काळे यांनी राखून वार चुकवला. अर्जुनला पकडताच त्याचा मुलगा सोपान याने अंमलदार गिते आणि राजेश यदमळ यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला चढवला. पत्नी सुरेखा हिने दगडफेक केली, तर मुलगी उमा हिने महिला अंमलदार वैष्णवी जटाळे व तुषार सपकाळ यांना धक्काबुक्की केली. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून उपनिरीक्षक कदम यांनी वरिष्ठांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक विवेक सोनवणे आणि उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अर्जुन आणि सोपानला ताब्यात घेतले. या हल्ल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर खुनाचा प्रयत्न (कलम १०९-१) आणि शासकीय कामात अडथळा (कलम १३२) आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन तांबे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. २०११ मध्ये चिकलठाणा ठाण्यात खून, २०१३ मध्ये करमाड येथे प्राणघातक हल्ला, २०२१ मध्ये सातारा ठाण्यात फसवणूक; तर मुकुंदवाडी ठाण्यात विनयभंग, मारहाण आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याच्यावर तेलंगणामध्ये तांब्याच्या तारा चोरल्याचे गुन्हे असून, यापूर्वी तेलंगणा पोलिस त्याच्या शोधात आले होते.
Source link
संभाजीनगरात पकडण्यास आलेल्या पोलिसांवर गुन्हेगाराच्या कुटुंबाकडून हल्ला:फसवणूक प्रकरणातील बेपत्ता आरोपीला पकडताना मुकुंदनगरमध्ये गोंधळ