![]()
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून समाजातील गरजूंची सेवा आणि लोकहिताचे कार्य करावे. त्यातूनच आई-वडिलांच्या ऋणातून काही प्रमाणात मुक्त होता येते, असा उपदेश युवराज महाराज दोंडाईचाकर यांनी केला. राधाई केदुशेठ बागड यांच्या पुण्यतिथीनिमित्त नानासाहेब केदुशेठ बागड ट्रस्टच्या वतीने राधाई मंगल कार्यालयात आयोजित एकदिवसीय कीर्तन सेवेत ते बोलत होते. कीर्तनातून समाजप्रबोधन करताना युवराज महाराज यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘कां रे नाठविसी कृपाळू देवासी, पोशितो जनासी एकला तो…’ हा अभंग निरूपणासाठी घेतला. त्यातून त्यांनी ईश्वरावरील श्रद्धा, जीवनातील कृतज्ञता आणि संतविचारांचे महत्त्व विशद केले. आई-वडिलांनी मुलांसाठी केलेले संस्कार, त्याग आणि कष्ट यांचे मोल कधीही करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बागड कुटुंबाच्या सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव करताना, पूर्वजांच्या स्मृती केवळ औपचारिकतेपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या नावाने समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ट्रस्टचा उपक्रम स्तुत्य असल्याचे महाराजांनी नमूद केले. भालचंद्र बागड यांच्या परिवारात देव मामलेदार यशवंतराव महाराजांची सेवा पाच पिढ्यांपासून सुरू असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. ओघवत्या व रसाळ वाणीतून संतविचार मांडत त्यांनी समाजसेवेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. या कीर्तन सोहळ्याच्या व्यासपीठावर ट्रस्टचे पदाधिकारी भालचंद्र बागड, अभिजीत बागड, स्वप्नील बागड यांच्यासह महाराष्ट्रातील कीर्तनकार संभाजी महाराज आणि परिमल महाराज उपस्थित होते. कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक, नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
समाजसेवेतून आई-वडिलांच्या ऋणाची परतफेड करा:सटाण्यात राधाई बागड यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात युवराज महाराज यांचा उपदेश