![]()
डोंगराळ भौगोलिक रचना, दुर्गम वाड्या-वस्त्या, शेतकरी आणि शेतमजूर वर्गाची मोठी लोकसंख्या, त्यात यंदा पावसाने दिलेली दडी आणि वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची शक्यता… अशा परिस्थितीत सोयगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी
.
सोयगाव तालुक्यात जरंडी, बनोटी आणि सावळदबारा अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांच्या अंतर्गत २३ आरोग्य उपकेंद्रामार्फत ८२ गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. तालुका आरोग्य कार्यालयांतर्गत एकूण ८२ पदे मंजूर असून, त्यापैकी ४९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील २३ उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या महिला आरोग्य सेविकांची संख्या अपुरी आहे. सद्यःस्थितीत अवघ्या १२ महिला आरोग्य सेविकांमार्फत ८२ गावांतील आरोग्यसेवेची जबाबदारी सांभाळली जात आहे. अनेक सेविकांकडे तीन ते चार उपकेंद्रांचा अतिरिक्त पदभार असल्याने गावोगावी भेटी देणे, माता-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, गर्भवतीची तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १० उपकेंद्रे असून, त्यामध्ये ३१ गावांचा समावेश आहे. या क्षेत्रासाठी पाच महिला आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यापैकी दीपाली सोळुंखे यांच्याकडे वरखेडी बु., पळसखेडा आणि सोयगाव या तीन उपकेंद्रांमधील सात गावांची जबाबदारी आहे. अश्विनी हिवराळे यांच्याकडे आमखेडा, निंबायती आणि घोसला या तीन उपकेंद्रांमधील १४ गावांचा भार आहे. दुर्गा आरते यांच्याकडे कंक्राळा, सावरखेडा आणि फर्दापूर परिसरातील गावांची जबाबदारी आहे. संगीता वानखेडे यांच्याकडे जरंडी उपकेंद्राची जबाबदारी असून, अनिता राठोड यांच्याकडे आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षकीय जबाबदारी आहे. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रामध्ये ३३ गावांचा समावेश आहे. काजल वाघ यांच्याकडे गोंदेगाव, पळाशी आणि किन्ही या तीन उपकेंद्रांमधील नऊ गावांची जबाबदारी आहे. शिल्पा परदेशी यांच्याकडे पहुरी बु., निंभोरा आणि नांदगाव या उपकेंद्रांमधील ११ गावांचा भार आहे. हर्षाली भगत यांच्याकडे वडगाव तिग्जी उपकेंद्रांतर्गत चार गावांची, तर सुनीता राठोड यांच्याकडे हनुमंतखेडा आणि बनोटी या दोन उपकेंद्रांमधील नऊ गावांची जबाबदारी आहे. सोयगाव तालुक्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहोत जोपर्यंत तालुक्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी संघर्ष करीत राहील, अशी माहिती सोयगाव येथील पंचायत समिती सदस्य सविता सोपान गव्हांडे यांनी दिली.
परिचरांची ११ पदे रिक्त तालुका आरोग्य कार्यालयातील पदनिहाय आकडेवारीनुसार, परिचरांची १४ पदे मंजूर असताना केवळ तीन कर्मचारी कार्यरत असून, ११ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नऊ मंजूर पदांपैकी सात पदे भरलेली असून, दोन रिक्त आहेत. आरोग्य सेवक पुरुषांच्या १७ पदांपैकी १४ पदे भरलेली असून, तीन रिक्त आहेत. आरोग्य सेवक महिलांच्या २५ मंजूर पदांपैकी केवळ १२ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, तब्बल १३ पदे रिक्त आहेत. औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या पाच पदांपैकी दोन, तर कनिष्ठ सहायकांच्या चार पदांपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सहाय्यक पुरुषांच्या एका संवर्गातील चार पदे पूर्ण भरलेली आहेत, तर दुसऱ्या संवर्गातील तीन पदांपैकी दोन पदांवर कर्मचारी कार्यरत असून, एक पद रिक्त आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून, त्यावर अधिकारी कार्यरत आहेत.