![]()
शेगाव-रहाटगाव परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, नाल्यांची स्थिती तसेच स्वच्छतेची कामे तपासून संबंधित अधिकाऱ्यांना नियमित साफसफाई करण्याच्या कडक सुचना देत पावसाळ्याच्या काळात नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी नाल्यांची तातडीने आणि नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी उत्तर झोन क्र. १ मधील विविध भागाची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मनपा आयुक्त डॉ. गोंदावले यांनी सोमवार ३ रोजी उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी करून नागरी स्वच्छता, पावसाळी पूर्वतयारी, नाल्यांची साफसफाई, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. आयुक्तांनी आशियाड कॉलनी व सन्मती कॉलनी परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, कचरा संकलन व्यवस्था तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली. परिसरात नियमित कचरा उचलला जावा, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग निर्माण होऊ नयेत तसेच स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपस्थित राहून जबाबदारीने काम करतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रहाटगाव रिंग रोड परिसरात पाहणी करताना रस्त्यालगतची स्वच्छता, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा, अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची स्थिती तपासण्यात आली. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वीजवाहिन्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादरम्यान नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नगरसेविका वंदना प्रदिप मडघे, कल्याणी आकाश तायडे, नगरसेवक चंदु खेडकर, गुड्डु धर्माळे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, उपअभियंता आशिष अवसरे, अजय विंचुरकर, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डिक्याव, अमरावती शहर समन्वयक श्र्वेता बोके, अभियंते, स्वास्थ निरीक्षक, संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्मशानभूमीची पाहणी आराधना कॉलनी, सौरभ कॉलनी, पोटे कॉलेज रोड, रहाटगाव स्मशानभुमीतील समस्यांची माहिती घेतली. चौकातील कचरा संकलन स्थळाची पाहणी करताना तेथील स्वच्छता व्यवस्था, नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा आढावा घेण्यात आला. यानंतर पोटे कॉलेज रोडवरील नाल्याची पाहणी करून नाल्यातील गाळ, अडथळे आणि पाण्याच्या प्रवाहाची स्थिती तपासण्यात आली. पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी नाल्यांमधील अडथळे त्वरित दूर करावेत, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत तसेच भविष्यात पाणी साचण्याच्या घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
Source link
स्वच्छता,कचरा व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना:उत्तर झोनमधील विविध भागांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी