Headlines

"हा सन्मान केवळ माझा नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या लढ्याचा":संमेलनाध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे भावपूर्ण उद्गार




शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला. विविध संस्थांनीही त्यांचा सत्कार केला. डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “आज मी खूप भारावून गेलो आहे. ही जबाबदारी मोठी आहे. एका महान साहित्यिक परंपरेची धुरा माझ्या खांद्यावर आली आहे. ती समर्थपणे कशी पेलायची, हे आव्हान माझ्यासमोर आहे. प्रत्येक लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावे असे वाटते; मात्र ही संधी ठरावीक लोकांनाच मिळते.” परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, डॉ. पी. डी. पाटील, राजेश पांडे, पुरुषोत्तम सप्रे, प्रदीप निफाडकर, गुरुय्या स्वामी, देविदास फुलारी आणि स्वाती महालांक यावेळी उपस्थित होते. डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “महाविद्यालयात गेल्यानंतर मला दलित साहित्याची ओळख झाली. त्याच काळात मी ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन लिहिले. हा सन्मान केवळ माझा नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आहे. समाजात दलितांच्या उत्थानासाठी अनेकांनी प्रयत्न केले.” “सरस्वती सन्मान मिळण्यापूर्वी मी मोठ्या प्रमाणावर लेखन केले होते. पुरस्कार मिळाल्यानंतरही माझी अवहेलना करण्यात आली. सरस्वती हा हिंदू पुरस्कार असल्याने तो स्वीकारू नये, अशी भूमिका काहींनी मांडली. मात्र, तो राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि गुणवत्तेच्या आधारावर भेदभाव संपवता येतो, या भूमिकेतून मी तो स्वीकारला,” असे डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले. “लेखन करताना प्रत्येक शब्दाबरोबर माझ्या मनात भय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असायचे. माझे लेखन प्रामुख्याने दलित वाचक वाचणार होते; त्याचे सामाजिक परिणाम काय होतील, याचीही भीती होती. मी प्रचंड जातीयवाद अनुभवला आहे. पुरोगामी विचार मांडणाऱ्यांनीच ते विचार सोडल्याने त्यांची पिछेहाट झाली,” असे डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणाले. डॉ. शरणकुमार लिंबाळे पुढे म्हणाले, “माझे विचारस्वातंत्र्य माझे स्वतःचे आहे. ते कोणाच्या पायावर कधी वाहणार नाही. आम्ही वेगळ्या जातीचे आहोत म्हणून आम्ही आमची भूमिका मांडायची नाही का? दलित साहित्य म्हणजे इथल्या प्रस्थापित साहित्याशी केलेला संवाद आहे.” साहित्य परिषदेतील मतभेदांबाबत बोलताना त्यांनी सर्वांना हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. सामाजिक चळवळींमध्ये परिवर्तनाच्या नावाखाली हुकूमशाही भूमिका घेतली जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “मी शेतकऱ्याचा मुलगा आणि ग्रामीण लेखक आहे. सामान्य माणसाने मला बळ दिले, त्यामुळेच आज मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो,” असे लिंबाळे म्हणाले. योगेश सोमण म्हणाले, “शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लिंबाळे यांची एकमताने निवड झाली, ही आनंदाची बाब आहे.”त्यांची पुस्तके वाचल्यानंतर आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांची ओळख झाली.’’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *