Headlines

बोईसर-नवापूर मार्गावर भीषण अपघात:समुद्रकिनारी फिरायला निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू, गणेशनगर परिसरात शोककळा




बोईसर-नवापूर मार्गावर पाम टेंभी गावाच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. एकाच दुचाकीवरून समुद्रकिनारी फिरण्यासाठी निघालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने बोईसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहित राकेश वर्मा, रवी विजय गुप्ता आणि नयना महातो अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मोहित आणि रवी हे इयत्ता 12 वीमध्ये, तर नयना इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत होती. तिघेही बोईसरमधील गणेशनगर परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी सायंकाळी तिघांनीही नांदगाव-आलेवाडी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाण्याचे ठरवले होते. त्यानुसार ते एकाच दुचाकीवरून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, बोईसर-नवापूर मार्गावरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत पोहोचल्यानंतर त्यांच्या दुचाकीची नवापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. दुचाकीचा वेग अधिक असल्याने धडकेची तीव्रता मोठी होती. या अपघातात दुचाकीवरील तिन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. मात्र, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच बोईसर आणि सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या दुर्घटनेमुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गणेशनगर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यासह या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *