![]()
राज्यातील रुग्णांना वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी तातडीने उपचार मिळावेत यासाठी तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या ‘१०८ रुग्णवाहिका’ ताफा वाढीच्या प्रकल्पातील १५० नव्या रुग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे जिल्ह्यातील औंध उपजिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या या रुग्णवाहिकांवर धुळीचे थर साचले असून, त्यांच्या देखरेखीसाठी २४ तास सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. १५ ऑक्टोबरला यातील ५० रुग्णवाहिकांची चाचणी यशस्वी होऊनही प्रत्यक्ष सेवा सुरू झालेली नाही. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी हा ताफा महत्त्वाचा असताना, आणखी १०० रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील २५० रुग्णवाहिकांचे एकत्रित उद्घाटन केले जाईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. नदीपासून समुद्रापर्यंत रुग्णवाहिका नव्या ताफ्यात २५५ प्रगत जीवनरक्षक, १ हजार २७४ मूलभूत जीवनरक्षक, ३६ नवजात बालकांसाठीच्या आणि १६६ दुचाकी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. याशिवाय १५ नदी-बोट आणि १० समुद्र-बोट रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे दुर्गम भागांसह जलमार्गांवरही आपत्कालीन वैद्यकीय सेवा पोहोचेल. नव्या ताफ्यामुळे सुमारे ३० मिनिटांचा प्रतिसाद वेळ १५ मिनिटांपर्यंत आणण्याचे लक्ष्य आहे. ‘सुमीत एसएसजी’ व ‘बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस’ या संयुक्त उपक्रमाकडे संचालनाची जबाबदारी दिली आहे. १२ वर्षांनंतर ताफा वाढणार; ३ वर्षे प्रकल्प रखडला राज्यात २०१४ मध्ये ‘१०८’ आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू झाली. अपघात, हृदयविकार, प्रसूती आणि अन्य गंभीर वैद्यकीय परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी उपचार देणे, हा या सेवेचा उद्देश आहे. सध्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पातून ८१९ रुग्णवाहिकांची भर पडणार असून, एकूण ताफा १ हजार ७५६ वर पोहोचेल. निधी उपलब्धतेस झालेल्या विलंबामुळे तीन वर्षे प्रकल्पाची अंमलबजावणी लांबली. आता रुग्णवाहिका तयार असूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन सध्या १५० रुग्णवाहिका दाखल आहेत. आणखी १०० रुग्णवाहिका येत आहेत. पहिल्या टप्प्यात २५० रुग्णवाहिकांचे एकत्रित उद्घाटन होईल. या १०० रुग्णवाहिकांची प्रतीक्षा आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन करू. – प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. पहिल्या टप्प्यातील १५० रुग्णवाहिका तयार पहिल्या टप्प्यात १५० रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी १५ ऑक्टोबरला ५० रुग्णवाहिकांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ३ प्रगत जीवनरक्षक आणि ४७ मूलभूत जीवनरक्षक रुग्णवाहिकांचा समावेश होता. चाचणी यशस्वी झाल्यानंतरही या रुग्णवाहिका मैदानातच उभ्या आहेत.
Source link
150 नव्या ॲम्ब्युलन्स धूळ खात पडून:आणखी 100 आल्यावर उद्घाटन- मंत्री, 50 रुग्णवाहिकांची चाचणीही झाली