Headlines

200 मुलींचे 'शैक्षणिक पालकत्व' घेणाऱ्या 'आनंदवल्लीच्या सावित्री':कुंदा बच्छाव यांची प्रेरणादायी कहाणी, राष्ट्रपतींनीही केलाय गौरव




वडिलांच्या परवानगीअभावी विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला नाही, शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र त्याच संघर्षातून प्रेरणा घेत कुंदा बच्छाव यांनी शेकडो मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पेरला. 2021 मध्ये अवघ्या 5 मुलींपासून सुरू झालेल्या ‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रमातून आज 150 ते 200 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जात आहे. आर्थिक परिस्थिती, बालविवाह आणि सामाजिक बंधनांमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या मुलींसाठी त्या आधारवड ठरल्या आहेत. शाळेतील नावीन्यपूर्ण प्रयोग, अनुभवाधारित शिक्षण, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिव्य मराठी डिजिटलज्या ज्ञानदीप सीरिजमध्ये जाणून घेऊयात त्यांचा अफलातून प्रवास… स्वतःच्या वाट्याला आलेल्या अभावांचे चटके सोसून दुसऱ्यांच्या कोमेजलेल्या बालपणावर सुखाची सावली धरण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या व्यक्ती समाजात फार कमी असतात. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव हे त्यापैकीच एक नाव. त्यांच्या दृष्टीने शाळा म्हणजे केवळ वर्गखोली आणि विद्यार्थी म्हणजे केवळ हजेरीपटावरील क्रमांक नाही. प्रत्येक विद्यार्थी एका कुटुंबाची आशा आणि देशाचे भविष्य आहे, या भावनेतून त्यांनी शिक्षणाला आनंद, अनुभव, विज्ञान, तंत्रज्ञान आणि जीवनमूल्यांची जोड दिली. स्वतःच्या शिक्षणासाठी संघर्ष केलेल्या या शिक्षिकेने आज अनेक मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळेच आनंदवल्ली परिसरात त्या ‘आनंदवल्लीची सावित्री’ म्हणून ओळखल्या जातात. स्वतःच्या शिक्षणासाठी संघर्ष; शिक्षकांनी दाखवली पुढची वाट कुंदा बच्छाव यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लकमापूर या मूळ गावी झाले. त्या पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होत्या. दहावीच्या परीक्षेतही त्यांनी चांगले गुण मिळवत यश संपादन केले. मात्र, पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची घरातून परवानगी नव्हती. त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा होती; परंतु गावात केवळ कला शाखेची सुविधा असल्याने त्यांना अकरावी आणि बारावीचे शिक्षण कला शाखेतूनच पूर्ण करावे लागले. त्यांच्या गुणवत्तेची जाणीव असलेल्या शिक्षकांनी पालकांची समजूत काढली. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आणि आई-वडिलांच्या परवानगीमुळे त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहिले. बारावीत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर त्यांनी डी.एड.ला प्रवेश घेतला. मालेगाव येथे दोन वर्षांचे डी.एड. शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, डी.एड.च्या दुसऱ्या वर्षातच त्यांचे लग्न झाले आणि लग्नानंतर त्या नाशिकला आल्या. शिक्षणातील गुणवत्तेमुळे त्यांना जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. 2005 ते 2010 या काळात त्यांनी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील जिल्हा परिषद शाळेत काम केले. त्यानंतर 2011 मध्ये नाशिक महानगरपालिकेत त्यांची नियुक्ती झाली. विश्वास नगर शाळेत दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर 2014 पासून त्या आनंदवल्ली, गंगापूर रोड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थिनींमध्ये दिसले स्वतःचे बालपण; तिथूनच सामाजिक कार्याची प्रेरणा शिक्षिका म्हणून काम करताना कुंदा बच्छाव यांना विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अडचणी जवळून समजू लागल्या. विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांची उदासीनता, कमी वयात लग्न लावून देण्याची घाई आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबवण्याचे प्रकार त्यांच्या निदर्शनास येत होते. शाळेत प्रवेश घेतलेल्या काही मुलांच्या पायात चप्पल नव्हती, हातात फाटकी वही होती, तर काहींची स्वप्ने गरिबीमुळे अपूर्ण राहण्याच्या मार्गावर होती. या मुलांची अवस्था पाहताना त्यांना स्वतःच्या बालपणाची आठवण होत असे. कारण, एकेकाळी त्यांनाही शिक्षणासाठी कुटुंबाची परवानगी मिळवताना संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून शिक्षणाची वाट खुली केली होती. त्यामुळे आज आपण ज्या पदावर आहोत, त्याचे श्रेय शिक्षकांनी दिलेल्या पाठबळाला आहे, याची त्यांना जाणीव होती. याच भावनेतून त्यांनी ठरवले की, ज्या मुलांना आणि मुलींना शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकता येत नाही, त्यांच्यासाठी आपणही कोणीतरी आधार बनले पाहिजे. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि स्वावलंबी झाली पाहिजे, हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला. कोरोना काळातील सर्वेक्षणातून समोर आले मुलींच्या शिक्षणाचे वास्तव 2021 मध्ये कोरोना काळात शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्वेक्षणादरम्यान कुंदा बच्छाव यांना अनेक विद्यार्थिनी शाळा सोडून घरी बसल्याचे दिसून आले. आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अनेक मुलींचे पुढील शिक्षण बंद झाले होते. एका विद्यार्थिनीच्या घरी भेट दिल्यानंतर तिची परिस्थिती पाहून त्या अस्वस्थ झाल्या. संबंधित मुलीला शिकण्याची इच्छा होती. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांना चार मुली होत्या. त्यामुळे सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच मुलगी लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी जाणार असल्याने तिच्या शिक्षणावर खर्च करण्याचा काय फायदा, अशी मानसिकताही कुटुंबात होती. मात्र, त्या मुलीचे स्वप्न वेगळे होते. तिला शिक्षिका व्हायचे होते. तिने कुंदा बच्छाव यांच्याकडे आपली शिकण्याची इच्छा व्यक्त केली. ही बाब समजल्यानंतर बच्छाव यांनी तिच्या पालकांची भेट घेतली. मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलू, अशी ग्वाही दिली. तसेच तिचे शिक्षण बंद करू नका, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरून घेण्यात आला. अभ्यासासाठी पुस्तके आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. घरातील कामे सांभाळून ती मुलगी रात्री अभ्यास करत होती. अखेर तिने दहावीची परीक्षा दिली आणि 65 टक्के गुण मिळवले. त्यानंतर तिचा अकरावी कॉमर्सला प्रवेश करून देण्यात आला. सध्या ती पुढील शिक्षण घेत आहे. एका मुलीला मिळालेली ही संधी पाहून इतर अनेक मुलींनीही शिक्षणासाठी मदतीची मागणी केली. यातूनच 2021 मध्ये ‘शैक्षणिक पालकत्व’ या उपक्रमाची सुरुवात झाली. 5 मुलींपासून सुरुवात; आज 150 ते 200 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सुरुवातीला अवघ्या 5 मुलींना शैक्षणिक पालकत्व देऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. मात्र, हळूहळू या कामाची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचू लागली. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलींची संख्या लक्षात घेऊन अधिकाधिक मुलींना मदत करण्याची गरज निर्माण झाली. सुरुवातीला स्वतःच्या क्षमतेनुसार कुंदा बच्छाव मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत होत्या. मात्र, मुलींची संख्या वाढू लागल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. अशा वेळी त्यांच्या मैत्रीण वैशाली म्हात्रे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून समाजाला मदतीचे आवाहन करण्यास सुरुवात केली. ‘एखाद्या मुलीला शिकायचे आहे, तिच्या शिक्षणासाठी मदत करू शकता का?’ असे आवाहन केल्यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे आले. आज जवळपास 200 दानशूर व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. कोणी आर्थिक मदत करते, तर कोणी पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देते. या माध्यमातून आज सुमारे 150 ते 200 मुलींना शैक्षणिक पालकत्व दिले जात आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका शिक्षिकेचा किंवा एका कुटुंबाचा प्रयत्न राहिलेला नाही, तर समाजातील अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन उभी केलेली चळवळ बनली आहे. कर्मधान फाउंडेशनची स्थापना; देणगीदारांच्या पैशांचा पारदर्शक हिशेब समाजातून आर्थिक मदत मिळू लागल्यानंतर या पैशांचा योग्य वापर आणि पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे कुंदा बच्छाव यांच्या लक्षात आले. मुलींच्या शिक्षणासाठी दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचते आहे, याचा विश्वास देणगीदारांना मिळणे गरजेचे होते. 2021 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या उपक्रमासाठी 25 हजार रुपयांचा पहिला धनादेश दिला. त्यानंतर ‘कर्मधान फाउंडेशन’ या संस्थेची नोंदणी करण्यात आली. आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणारी आर्थिक मदत संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात जमा केली जाते. देणगीदारांना मदतीची अधिकृत पावती दिली जाते. तसेच खर्च झाल्यानंतर त्यासंबंधीच्या पावत्याही दाखवल्या जातात. त्यामुळे या उपक्रमात आर्थिक पारदर्शकतेला विशेष महत्त्व दिले जाते. बालविवाहाच्या उंबरठ्यावरून मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले कुंदा बच्छाव यांच्या कामातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बालविवाह रोखण्यासाठी आणि लग्नानंतरही मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. 2011 मध्ये त्यांच्या वर्गातील सीमा आणि शिल्पा या दोन विद्यार्थिनींचे आठवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्न लावून देण्यात आले होते. त्यांच्या पालकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. या घटनेने त्या अस्वस्थ झाल्या. पुढील मुलींच्या बाबतीत असे घडू नये, यासाठी काहीतरी ठोस करण्याची गरज त्यांना जाणवली. पुढे शैक्षणिक पालकत्वाच्या माध्यमातून अशा मुलींना मदत करण्यास सुरुवात केली. काही प्रकरणांमध्ये मुलींचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे लग्न लावून देण्याचे प्रयत्न झाले. अशा वेळी त्यांनी पालकांना बालविवाहाच्या कायद्याची जाणीव करून दिली आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घेण्याचा इशाराही दिला. एका मुलीचे नववीत प्रवेश घेतल्यानंतर तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाला. लग्नानंतरही त्या मुलीने गुपचूप फोन करून कुंदा बच्छाव यांच्याशी संपर्क साधला. तिला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बच्छाव यांनी प्रयत्न केले. अखेर तिला पुन्हा नाशिकला आणून तिच्या प्रवेशप्रक्रियेचे काम पूर्ण केले आणि शिक्षण सुरू ठेवले. आज त्यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रमात अशा चार मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतरही त्यांचे शिक्षण सुरू आहे. त्यापैकी एका विद्यार्थिनीला बाळही आहे. तरीही ती बी.कॉम.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे पती आणि माहेरचे कुटुंबीयही तिला शिक्षणासाठी पाठबळ देत आहेत. येवल्यातील विद्यार्थिनीचा प्रवास; नववीपासून पुण्यापर्यंत भरारी कुंदा बच्छाव यांच्या कामातील एक अभिमानाचा क्षण म्हणजे येवला येथील एका विद्यार्थिनीचा प्रवास. या मुलीचे वडील नव्हते, तर आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले होते. एका शिक्षक मैत्रिणीच्या माध्यमातून या मुलीची माहिती बच्छाव यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर नववीपासून तिला शैक्षणिक पालकत्व देण्यात आले. या मुलीनेही मिळालेल्या संधीचे सोने केले. नववी आणि दहावीमध्ये ती शाळेत प्रथम आली. त्यानंतर अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण करून तिने बीसीएचे शिक्षण घेतले. बीसीएच्या तिन्ही वर्षांत तिने प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या गुणवत्तेची दखल घेत महाविद्यालयानेही तिच्या शुल्कात सवलत दिली. पुढील शिक्षणासाठी तिला पुण्यात कोडिंगचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथेही तिने विविध प्रोजेक्ट पूर्ण केले असून तिच्या कामाचे कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीने मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईसोबत कुंदा बच्छाव यांचाही फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. एका विद्यार्थिनीने आपल्याला आईचा दर्जा देणे, ही आपल्या कामाची सर्वात मोठी पावती असल्याची भावना बच्छाव यांनी व्यक्त केली. वर्गखोलीचे प्रयोगशाळेत रूपांतर; अनुभवातून शिक्षण देण्यावर भर कुंदा बच्छाव यांचे काम केवळ मुलींच्या शैक्षणिक पालकत्वापुरते मर्यादित नाही. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी, अनुभवाधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. टॉय बेस्ड लर्निंग, जॉयफुल लर्निंग, ड्रामा बेस्ड लर्निंग, कवितेचा तास, विद्यार्थ्यांचे स्वतःचे रेडिओ स्टेशन, STEM उपक्रम आणि QR कोड आधारित स्व-अध्ययन अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी वर्गखोलीला जिवंत प्रयोगशाळेचे स्वरूप दिले. त्यांच्या मते, संपूर्ण जग हेच विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक आहे. त्यामुळे मुलांना केवळ पुस्तकातील माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. याच विचारातून त्यांनी विद्यार्थ्यांना बँका, भाजी बाजार, रोपवाटिका, वृद्धाश्रम, गॅरेज, उद्योग आणि पंचतारांकित मॉल अशा विविध ठिकाणी नेऊन शिक्षण दिले. एका विद्यार्थ्याने ‘मॅडम, विमान जवळून कसे दिसते?’ असा प्रश्न विचारला. त्यावर केवळ उत्तर देण्याऐवजी त्यांनी लोकसहभागातून निधी उभारला आणि विद्यार्थ्यांना एकही रुपया खर्च न करता विमान प्रवास घडवून आणला. दूरून आकाशात दिसणारे विमान विद्यार्थ्यांनी प्रथमच जवळून अनुभवले. हा प्रवास केवळ सहल नव्हता, तर अनुभवाधारित शिक्षणाचा अभिनव प्रयोग होता. विद्यार्थ्यांना मुंबईतील विधान भवनात नेऊन लोकशाहीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. इस्रो, बंगळुरू येथे अवकाश संशोधनाची माहिती घेण्याची संधी देण्यात आली. तसेच IISER पुणे आणि सायन्स पार्क, चिंचवड येथे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे अनुभव मिळाले. ‘बंदी ग्लास’ या उपक्रमातून त्यांनी वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले. विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन शिकावे आणि समाजातील अनुभव वर्गात आणावेत, हा या उपक्रमामागील उद्देश होता. संविधान साक्षरता उपक्रमातून विद्यार्थ्यांना संविधान, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्यांची माहिती देण्यात आली. जीवनकौशल्यांचे धडे; आईच्या कष्टांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर आयुष्यात आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करणेही आहे, असे कुंदा बच्छाव मानतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरातील कामांचे महत्त्व समजावे आणि आईच्या कष्टांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी वर्गातच जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांकडून कणिक मळणे, भाकरी थापणे, भांडी घासणे, कपडे धुणे, बटन लावणे आणि फाटलेले कपडे शिवणे यांसारखी कामे करून घेतली. यातून मुलांना घरकामाची समज मिळाली. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या श्रमांचा आदर करणे, कृतज्ञता आणि जबाबदारीची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. 2 हजार पुस्तकांचे वाचनालय; मुलांसाठी गावाच्या भिंती झाल्या ज्ञानभिंती विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी लोकसहभागातून शाळेत सुमारे 500 पुस्तकांचे ‘तरंग वाचनालय’ सुरू केले. शाळेतील संदर्भ वाचनालयातही पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळेच्या तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत संदर्भ वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली असून, एकूण पुस्तकसंग्रह सुमारे 2 हजारांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे वाचन कमी होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी ‘मिशन मोबाईल मुक्ती’ उपक्रम सुरू केला. याअंतर्गत आनंदवल्लीतील मारुती मंदिर आणि संत कबीर नगर येथे खुले वाचनालय सुरू करण्यात आले. या ठिकाणी सुमारे 1 हजार पुस्तकांची उपलब्धता करण्यात आली. शाळेनंतर विद्यार्थी आणि पालक एकत्र बसून पुस्तके वाचू लागले. त्यामुळे वाचनाचा उपक्रम शाळेच्या बाहेरही पोहोचला. उन्हाळी सुट्टीत गावातील भिंतींवर शब्दकोडी, गणितीय क्लुप्त्या, देश-राज्यांची माहिती आणि शैक्षणिक चित्रे रंगवण्यात आली. जवळपास 50 भिंतींवर शैक्षणिक माहिती साकारून संपूर्ण गावालाच खुल्या वर्गखोलीचे स्वरूप देण्यात आले. मुलांना घराबाहेर पडल्यावरही शिकण्याची संधी मिळावी आणि पालकांचाही या प्रक्रियेत सहभाग वाढावा, हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ; राष्ट्रीय स्तरावरही यश विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा कुंदा बच्छाव यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली NCERT, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय व्हिडिओ मेकिंग स्पर्धेत विद्यार्थी किरण सोनार याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई येथे आयोजित क्युब कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. कृत्रिम उपग्रह निर्मितीत योगदान दिल्याबद्दल विद्यार्थिनी शितल ठाकरे हिच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याशिवाय NMMS शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा आणि विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. महाराष्ट्र शासन आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेतही सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांनी पारितोषिके मिळवली. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असामान्य क्षमता असते; गरज असते ती योग्य संधी, मार्गदर्शन आणि स्वतःवर विश्वास निर्माण करून देण्याची, असे त्या सांगतात. स्मार्ट अटेंडन्समुळे पालकांना मुलांच्या सुरक्षिततेची खात्री विद्यार्थ्यांचे शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. अनेक पालक सकाळी कामासाठी घराबाहेर पडतात. अशा वेळी मुले शाळेत पोहोचली आहेत की नाही, याची त्यांना चिंता असते. ही समस्या लक्षात घेऊन कुंदा बच्छाव यांनी शाळेत ‘स्मार्ट अटेंडन्स’ उपक्रम सुरू केला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना RFID तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट आयकार्ड देण्यात आले. विद्यार्थी शाळेत आल्यावर कार्ड स्कॅन केले जाते. त्यानंतर ‘Your child reached at school’ असा संदेश पालकांच्या मोबाईलवर जातो. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडताना पुन्हा कार्ड स्कॅन केल्यावर ‘Your child left from school’ असा संदेश पाठवला जातो. यामुळे पालकांना मुलांच्या शाळेतील उपस्थितीची आणि सुरक्षिततेची माहिती तत्काळ मिळते. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची वेळ आणि तारीख यांची नोंद ठेवता येते. महानगरपालिकेच्या शाळेत तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेला हा उपक्रम पालकांसाठी उपयुक्त ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांशी संवाद कमी; पालकांना दिला महत्त्वाचा संदेश सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर हा मुलांच्या जडणघडणीसमोरील मोठा प्रश्न बनत असल्याचे कुंदा बच्छाव सांगतात. पालक स्वतः मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यांचे पाहून मुलेही मोबाईल आणि टीव्हीमध्ये अधिक वेळ घालवू लागली आहेत. त्यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. आज अनेक मुले रील्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवण्याऐवजी बराच वेळ केवळ स्क्रोल करण्यात जात आहे. याचा परिणाम मुलांच्या वागणुकीवर, विचारांवर आणि अभ्यासावर होत असल्याचे त्या सांगतात. मुलांना केवळ अभ्यास झाला का, जेवण झाले का, एवढेच विचारणे पुरेसे नाही. त्यांच्या मनात काय सुरू आहे, त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून त्यांच्यासोबत वेळ घालवावा. शिक्षक आणि पालकांनी मुलांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना योग्य-अयोग्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे, असा संदेश त्या देतात. 21 वर्षांच्या शिक्षकी प्रवासाला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची पावती 2005 पासून शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या कुंदा बच्छाव यांनी आपल्या 21 वर्षांच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील त्यांच्या एका विद्यार्थिनीने डॉक्टर होऊन गरीब रुग्णांना सेवा देण्याचा मार्ग निवडला आहे. तर दुसरी विद्यार्थिनी इंजिनिअर झाली आहे. त्यांच्या शिक्षकी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या संपूर्ण शिक्षकी प्रवासातील आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. विद्यार्थ्यांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, आलेल्या अडचणी, अपयशानंतर पुन्हा केलेले प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांसाठी केलेली धडपड या सगळ्यांचा हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून विद्यार्थ्यांच्या कष्टांचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि शिक्षकांवर त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा गौरव असल्याचे त्या मानतात. शिक्षकाचा खरा सन्मान पुरस्कारात नसतो, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात असतो, असेही त्या सांगतात. या सन्मानामुळे जबाबदारी अधिक वाढली असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यातील स्वप्न ओळखून त्याला बळ देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. ‘प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे’ मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात काही प्रमाणात जागरूकता वाढली असली, तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये आजही मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणात भेदभाव केला जातो. मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याबाबत अनेक कुटुंबांमध्ये अनास्था दिसते. ग्रामीण भागात ही समस्या अधिक जाणवत असल्याचे कुंदा बच्छाव सांगतात. त्यामुळे केवळ शाळेत प्रवेश मिळवून देणे पुरेसे नाही, तर मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आधार देणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. प्रत्येक व्यक्तीच्या आत काही ना काही चांगले गुण आणि क्षमता दडलेल्या असतात. त्या क्षमतांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतरांना आधार देण्यासाठीही केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला किंवा विद्यार्थ्याला मदतीचा हात दिल्यास मिळणारे समाधान वेगळेच असते. इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. आज आनंदवल्लीमध्ये त्याच विचारांचा वारसा जपत कुंदा बच्छाव शिक्षणाला अनुभव, संस्कार, विज्ञान, तंत्रज्ञान, वाचन, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देत आहेत. त्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी तयार करत नाहीत, तर आयुष्यासाठी घडवत आहेत. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप लावण्याचे काम कुंदा बच्छाव करत आहेत. मात्र, त्यांनी पेटवलेला हा दीप आता केवळ एका वर्गापुरता किंवा एका शाळेपुरता मर्यादित राहिलेला नाही. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने तो शेकडो मुलींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करत आहे. स्वतःच्या शिक्षणासाठी संघर्ष केलेल्या एका मुलीने आज इतर मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. म्हणूनच आनंदवल्लीतील कुंदा बच्छाव यांचा प्रवास हा केवळ एका शिक्षिकेच्या यशाचा नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्याच्या जिद्दीचा प्रवास ठरतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *