Headlines

'नीट' पेपरफुटीची व्याप्ती आणखी वाढणार:पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे समोर; हायप्रोफाईल पालक सीबीआयच्या रडारवर




केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला महाराष्ट्र व राजस्थानात नीट पेपरच्या अनेक प्रिंट काढून त्याची विक्री केल्याचे पुरावे मिळालेत. विशेषतः या प्रकरणी अनेक हायप्रोफाईल पालकांचा समावेश असल्याची माहिती असून, आता हे सर्वच तपास यंत्रणेच्या रडारवर आलेत. या घटनाक्रमामुळे नीट पेपरफुटीचे प्रकरण भविष्यात आणखी व्यापक वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेली नीट-2026 परीक्षा गत 3 मे रोजी देशभरात झाली होती. पण त्यानंतर अवघ्या 4 दिवसांतच या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 3 मेची परीक्षा रद्दबातल करत ती 21 जून रोजी पुन्हा घेण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला महाराष्ट्र व राजस्थानात फुटलेल्या पेपरच्या प्रिंट काढून त्याची विक्री झाल्याचे पुरावे आढळलेत. पेपरची प्रिंट काढून केली विक्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला महाराष्ट्र व राजस्थानात नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे आढळलेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, पेपर फोडणाऱ्यांकडून नीटचा पेपर मिळाल्यानंतर काही लोकांनी नीटचा पेपरच्या प्रिंट काढून त्या इतर लोकांना विकल्या होत्या. पण या प्रकरणी नेमक्या किती लोकांनी हा पेपर खरेदी केला होता? हे अद्याप सीबीआयला निश्चित करता आले नाही. त्यामुळे पेपर किती लोकांपर्यंत पोहोचला याचा शोध घेणे सध्या सुरू आहे. ही साखळी खूप मोठी असल्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नीट पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र आतापर्यंतच्या तपासात महाराष्ट्र हे नीट पेपरफुटीचे सर्वात मोठे केंद्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातूनच नीटचा पेपर राजस्थान व इतर राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पेपर फोडणारे दलाल व सूत्रधारच नव्हे, तर मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी करणारे हायप्रोफाईल पालकही यासंबंधी सीबीआयच्या रडारवर आहेत. एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांनी आपल्या बँक खात्यांतून शिवराज मोटेगावकर, पी व्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे व मनीषा मांढरे यांच्या खात्यांत पैसे ट्रान्सफर केले. सीबीआयच्या 3 पथकांकडून आता पुढील साखळी म्हणजे पेपर खरेदी करणारे नातेवाईक व विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणी इतर राज्यांत छापेमारी होण्याचीही शक्यता आहे. लातूर येथील तिसऱ्या डॉक्टरची चौकशी सीबीआयने आतापर्यंत लातूर येथील 2 डॉक्टरची चौकशी केली आहे. त्यानंतर आता एका बीएएमएस डॉक्टरकडेही आपला मोर्चा वळवला आहे. या डॉक्टरचे रुग्णालय जुना औसा रोड परिसरात आहे. अधिकारी तेथील दस्तऐवज व इतर संपर्कांची पडताळणी करत आहेत. सीबीआयने या कारवाईची औपचारिक माहिती दिली नसली तरी शहरात या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई येथील 2 संशयित विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. हे विद्यार्थी डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या संपर्कातील आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *