Headlines

जागतिक तंबाखू निषेध दिन; काँग्रेसकडून 'व्यसनांची होळी' उपक्रम:डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले – तरुणांना व्यसनमुक्त करणे आवश्यक




जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (३१ मे) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातर्फे ‘व्यसनांची होळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी युवा पिढीला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. गंगवाल म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढी निरोगी आणि व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे काळाची गरज आहे. व्यसनाच्या जाहिरातींद्वारे तरुणांची दिशाभूल केली जात असून, याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजिका आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी सांगितले की, देशाचे भविष्य असलेली युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकल्यास देशाची प्रगती खुंटेल. सशक्त भारतासाठी तरुण पिढी निरोगी आणि व्यसनमुक्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी काँग्रेस भवनच्या पटांगणात तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांची ‘होळी’ करण्यात आली. चवधरी यांनी सांगितले की, पुणे काँग्रेस केवळ आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता, भविष्यातही शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवेल. याप्रसंगी डॉ. कल्याण गंगवाल यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. पुणे मनपा काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. ते म्हणाले की, शालेय विद्यार्थी आणि तरुणांना व्यसनाकडे आकर्षित केले जात आहे, ही चिंतेची बाब आहे. पुणे शहराला ‘ड्रग्जमुक्त’ करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम लढा देत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप्ती चवधरी यांनी डॉ. कल्याण गंगवाल यांचे स्वागत आणि सत्कार केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *