![]()
‘पेट्रोल आहे का नाही?’ हे विचारल्यानंतर ‘मला माहित नाही. केबिनमध्ये मालकाला विचारा’, असे सांगणाऱ्या पलंबरचा दोघाजणांनी लोखंडी राडने मारून खून केल्याची घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नांदेड-लोहा मार्गावरील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर सध्या बाथरूम आणि टॉयलेटचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मुख्य प्लंबर किफायात आली खाजा मोईनुद्दीन हे त्यांचे सहकारी मोहम्मद अस्लम उस्मान आणि शेख जानी शेख गुलाब यांच्यासोबत काम करत होते. या दरम्यान, सोनखेड येथील रहिवासी असलेले बालाजी शिवाजी मोरे आणि पवन चौधरी हे दोघे जण एम.एच. १४ सी.टी. ७२४५ क्रमांकाच्या दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले. दुचाकीस्वार बालाजी मोरे याने तिथे काम करणाऱ्या प्लंबरला ‘पेट्रोल चालू आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर प्लंबरने, “आम्हाला माहीत नाही, तुम्ही केबिनमध्ये जाऊन विचारून घ्या,” असे साधे उत्तर दिले. लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि लोखंडी रॉडने हल्ला केबिनमध्ये विचारण्यास सांगितल्याचा राग मनात धरून बालाजी मोरे आणि पवन चौधरी यांनी तेथे काम करणाऱ्या मोहम्मद अस्लम उस्मान आणि जानी शेख गुलाब यांच्याशी थेट वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, आरोपींनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. आपल्या सहकाऱ्यांना मारहाण होत असल्याचे पाहून तिथे हजर असलेले मुख्य प्लंबर किफायात आली हे वाद सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, नराधम आरोपींनी किफायात आली यांना जातीवाचक शिवीगाळ करत, त्यांच्यावर लोखंडी रॉडने थेट हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, लोखंडी रॉड डोक्यात लागल्याने किफायात आली हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आरोपी पोलिसांच्या ताब्यात हल्ल्याची घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली. दोन्ही आरोपी नांदेड शहरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा (मर्डर) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Source link
किरकोळ वादातून पलंबरचा खून:बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार, नांदेडमधील सोनखेड पेट्रोल पंपावरील घटना