Headlines

सिंधी समाजाला एकत्र आणण्यासाठी 'विश्व सिंधी सेवा संगम'चा पुढाकार:1 ऑगस्टला उद्घाटन सोहळा, बॉबी कर्नानी यांची माहिती




पुण्यातील सुमारे ४५ हजार सिंधी बांधवांना एका संघटित व्यासपीठावर आणण्यासाठी ‘विश्व सिंधी सेवा संगम (युनायटेड)’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी होणार असून, सिंधी समाजाची एकजूट वाढवण्यासह सांस्कृतिक वारशाचे जतन, शिक्षण, सामाजिक कार्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. ही माहिती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा बॉबी कर्नानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेतर्फे शहरभर विभागनिहाय गट आणि मध्यवर्ती कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विखुरलेल्या सिंधी समाजाला एकत्र आणून शासनाच्या विविध योजना, अनुदाने आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे कर्नानी यांनी सांगितले. यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करणे शक्य होईल. संस्थेतर्फे चेटीचंड, लाल लोई, सिंधी भाषा दिन आणि सिंधी संमेलन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. सिंधी भाषा व परंपरा जतन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच, दरवर्षी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी शहराबाहेरील विशेष सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ सिंधी मुलींच्या विवाहासाठी मदत आणि गरजू कुटुंबांना सहाय्य करण्याचाही संस्थेचा मानस आहे, असे डॉ. हिमांशू अजवानी यांनी नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मदत, मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व नागरी सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येतील. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधी उद्योजक आणि व्यावसायिकांची माहिती असलेली बिझनेस डिरेक्टरी तयार केली जाईल. उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, समाजोपयोगी व सांस्कृतिक उपक्रमांसाठी निधी संकलनावरही भर दिला जाईल. या पत्रकार परिषदेला प्रकाश कर्नानी, हिमांशू अजवानी, डॉ. डिंपल अजवानी, शाम ठाकूर, कुणाल हेमराजानी, हितेश सुगनानी, अमित मिरपुरी, सतीश अथवानी, करिश्मा अथवानी, सरिता पुरसवानी आणि हरीश डोडेजा उपस्थित होते. ‘विश्व सिंधी सेवा संगम’ ही संस्था गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत असून, ९२ देशांमध्ये तिचे कार्य सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *