![]()
हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परसह १०.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर मंगळवारी ता. ३० हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली असून या पथकाकडून दररोज पहाटे व रात्रीच्या सुमारास वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आज पहाटे एका टिप्पर मधून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, शेख मोहसीन, दिलीप लेकुळे, आकाश बोथीकर यांच्या पथकाने आज पहाटे साडेपाच वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावर वाहनाची तपासणी सुरु केली होती. यावेळी पोलिसांनी एक टिप्पर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता चालकाला समाधानकारक उत्तरे देता नाली नाही. या शिवाय वाळू वाहतूकीच्या पावत्या देखील आढळून आल्या नाही. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार गणेश लेकुळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी टिपर चालक गोपाळ राठोड (रा. ब्राम्हणवाडा ता. औंढा), कपील शेवाळे (रा. हिंगोली), गजानन मोरे (रा. माळीपुरा लोणार) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोपाळ व कपील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत अवैध वाळू वाहतूक:10.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल