Headlines

जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा:56 हजार क्युसेक पाण्याची आवक, 9 तासांत 2 टक्क्यांनी वाढ




छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. गंगापूरमधून ४९४७ क्युसेक, दारणामधून ५३३० क्युसेक, कडवामधून २३३० क्युसेक आणि पालखेडमधून १९८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमधमेश्वरमधून सध्या ४६२२७ क्युसेक इतका प्रचंड विसर्ग सुरू आहे. याशिवाय, निळवंडे धरणातूनही ४८५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व आवकेमुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सध्या जायकवाडी धरणात १२६१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा १९९९ दलघमी इतका आहे, जो ५८.१२ टक्के दर्शवतो. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणे पूर्ण भरल्यामुळे हा विसर्ग असाच सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल. सोमवारी सकाळी ९ वाजता जायकवाडी धरणात ५५.९९ टक्के (१२१५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा) पाणीसाठा होता. रात्री ९ वाजेपर्यंत हा साठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला. अवघ्या नऊ तासांत धरणात ४६ दलघमी पाण्याची आवक झाली, ज्यामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *