![]()
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर देशाचे नवे शिक्षणमंत्री कोण होणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी, आजची तरुण पिढी (जेन-झी) आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून त्यांना या पदावर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असा दावा कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2026 च्या ‘नीट’ परीक्षा पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक कोचिंग क्लासेस आणि पेपर तयार करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास व्यक्त करणे कठीण आहे. या संपूर्ण घोटाळ्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांचाही सहभाग होता का, हे केवळ निष्पक्ष एसआयटी चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले की, सीजेपी आणि तरुण पिढीने केलेल्या ऐतिहासिक आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपले पद गमवावे लागले आहे. हा आंदोलकांचा मोठा विजय मानला जात असून, पंतप्रधानांनी तूर्तास प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालायचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. जोशी यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची मंत्रालये असताना आता हे चौथे खाते जोडले गेले आहे. मात्र संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापर्यंत केलेली ही केवळ एक तात्पुरती सोय आहे. आरएसएस विचारसरणीच्या निष्ठवंतांची भरती पुढे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, कोलमाडलेली शिक्षण व्यवस्था रुळावर आणणे, शिक्षणासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणे आणि आजच्या तरुण पिढीशी थेट संवाद साधू शकणाऱ्या एका राष्ट्रीय स्तरावरील पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची देशाला तातडीने गरज आहे. परंतु, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशी खसंता असलेला एकही नेता दिसत नाही. तसेच शिक्षण व्यवस्थेत आरएसएस विचारसरणीच्या निष्ठवंतांची भरती केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. नंदन निलेकणी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर विश्वास उरला नसल्याने आता एखादा शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू किंवा सनदी अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात नाव न घेता कॉर्पोरेट जगतातील नंदन निलेकणी यांच्यासारख्या नामांकित व्यक्तीचाही या पदासाठी विचार होऊ शकतो का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे.
Source link
केंद्रीय शिक्षणमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची चर्चा:देशातील तरुण पिढी आणि जेन-झी त्यांना स्वीकारणार नाही- पृथ्वीराज चव्हाण