![]()
माढा तालुक्यातील चांदज येथील १७ वर्षीय कुस्तीपटू पै. हनुमंत राजेंद्र जाधव याने अझरबैजानची राजधानी बाकू येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ मध्ये ४५ किलो फ्रीस्टाईल गटात ब्राँझ पदक पटकावत देशासह माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने इराणच्या महादी दाऊद दमेशचेली याचा ७-१ अशा फरकाने पराभव करून भारताला पदक मिळवून दिले. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मोलमजुरी करून संसार सांभाळणारे कुटुंब, अपुऱ्या सुविधा आणि कठोर परिश्रम अशा संघर्षमय प्रवासातून हनुमंतने जागतिक स्तरावर यश मिळविल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हनुमंतचे आजोबा पैलवान असल्याने लहानपणापासूनच त्याच्यामध्ये कुस्तीची आवड निर्माण झाली. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्याने कुस्तीचा सराव सुरू केला. प्राथमिक प्रशिक्षण गोडबा पाटील कुस्ती प्रशिक्षण केंद्र, खुडूस येथे झाले. त्यानंतर एनटीएस कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक महादेव ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला अधिक धार मिळाली. शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. त्यानंतर लखनौ येथे झालेल्या राष्ट्रीय अंडर-१७ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारतीय संघात स्थान मिळविले. जागतिक स्पर्धेतही दमदार कामगिरी करत त्याने भारतासाठी ब्राँझ पदक जिंकले. “देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे हेच माझे ध्येय’ ^”ब्राँझ पदक मिळाल्याचा आनंद आहे; मात्र माझे अंतिम ध्येय भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच आहे. आर्थिक अडचणींमुळे खुराक आणि सरावावर परिणाम होत आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि क्रीडा विभागाने मदतीचा हात दिल्यास अधिक चांगली तयारी करून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न निश्चित पूर्ण करेन.” पैलवान हनुमंत जाधव पांडुरंग शिंदे |मानेगाव ^”घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मुलाच्या स्वप्नांसाठी आम्ही मोलमजुरी केली. अनेक अडचणी आल्या, पण त्याचा सराव कधी थांबू दिला नाही. आज त्याने भारतासाठी जागतिक स्पर्धेत पदक जिंकून आमचे कष्ट सार्थकी लावले. आता त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकावे, हीच आमची इच्छा आहे. -चिमा जाधव हनुमंत ची आई ^”हनुमंत हा अत्यंत जिद्दी आणि मेहनती खेळाडू आहे. त्याच्यात जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. मात्र स्पर्धेपूर्वी अपेक्षित प्रशिक्षण शिबिर मिळाले नाही. योग्य कॅम्प आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास तो भारतासाठी निश्चितच सुवर्णपदक जिंकेल. – महादेव ठवरे, वस्ताद वय : १७ वर्षे स्पर्धा : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ स्थळ : बाकू (अझरबैजान) गट : ४५ किलो फ्रीस्टाईल कामगिरी : ब्राँझ पदक कांस्यपदकाची लढत : इराणच्या महादी दाऊद दमेशचेलीचा ७-१ ने पराभव प्रशिक्षण : गोडबा पाटील कुस्ती प्रशिक्षण केंद्र, खुडूस, प्रशिक्षक : वस्ताद महादेव ठवरे
Source link
आजोबांकडून मिळाली कुस्तीची प्रेरणा:मोलमजुरी करणाऱ्या आईच्या मुलाची जागतिक स्तरावर स्पर्धेत दमदार झेप