Headlines

स्वतंत्र्यदिनी हिंगणघाट हादरले:ध्वजारोहणासाठी निघालेल्या 3 शाळकरी मुलींना भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडले, तिघींचाही मृत्यू




एकिकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरावर मात्र अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी मुलींच्या दुचाकीला एका सुसाट खासगी ट्रॅव्हल्सने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. या भीषण अपघातात तिन्ही अल्पवयीन विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नेमका अपघात कसा झाला? समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी या तिघीही मैत्रिणी एकाच दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बाहेर निघाल्या होत्या. त्यांचा प्रवास आंबेडकर शाळेजवळ आला असतानाच, पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रस्त्यावरच रक्ताचे थारोळे अन् उपचारादरम्यान मृत्यू बसची धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील तिन्ही मुली थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलींना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही तिघींनाही वाचवण्यात यश आले नाही. उपचारादरम्यान या चिमुकल्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलीस कारवाई सुरू एकाच वेळी तीन कोवळ्या जीवांचा अंत झाल्याने हिंगणघाट शहरात सध्या प्रचंड हळहळ आणि सुन्न करणारी शांतता आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठून पाहणी केली आणि रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली. सध्या या निष्पाप मुलींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेण्याची आणि त्याच्यावर कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. हेही वाचा.. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह: मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालयात, एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तर सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये केले ध्वजारोहण देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सविस्तर वाचा ‘स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका’:पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *