Headlines

उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना सांगितीक मानवंदना:ढोलकी, गायन, तबलावादनाने 33 व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली




फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना त्यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त सांगितीक मानवंदना देण्यात आली. बहारदार ढोलकी वादन, किराणा घराण्यातील बंदिशींचे सुमधुर गायन आणि तालबद्ध तबलावादनातून ही आदरांजली अर्पण करण्यात आली. उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक सलीम अख्तर यांच्यासह त्यांच्या शिष्य परिवारातर्फे पुणे येथील भरत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित राजू जावळकर यांच्या ढोलकी वादनाने झाली. त्यांनी पारंपरिक कायदे आणि रेले सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना उदय शहापूरकर यांनी नगमा साथ दिली. यानंतर किराणा घराण्याचे युवा गायक मोहसीन अली खान यांनी गायन सादर केले. त्यांनी राग पूरिया धनाश्रीमधील ‘बल बल जाऊ’ या बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर द्रुत तालात ‘मुश्किल करो आसान मोरी ख्वाजा’ आणि रूपक तालातील ‘मेहेर की नजर होवे मोपे’ या रचना सादर केल्या. ‘प्रितम से एसी कौन भूल भयी’ ही रचना प्रभावीपणे सादर करत त्यांनी खमाजमधील ‘रंग रंगिली रसिली छबिली’ या ठुमरीने गायनाची सांगता केली. त्यांना सलीम अख्तर यांनी तबल्यावर, तर उदय शहापूरकर यांनी संवादिनीवर साथ दिली. कार्यक्रमाची सांगता पंडित नवीन शर्मा यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीनताल सादर केला आणि त्यानंतर उस्ताद झाकिर हुसेन तसेच उस्ताद वाजीद अली हुसेन खानसाहेब यांनी निर्मिलेले रेले, कायदे, चक्रदार यांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या तबलावादनावरील प्रभुत्वाने रसिकांना अनोखी सांगितीक मेजवानी मिळाली. त्यांना राजस खासगीवाले यांनी नगमा साथ केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फैय्याज हुसेन खानसाहेब, अन्वर कुरेशी, पंडित पांडुरंग मुखडे, अली हुसेन, प्रकाश केमकर, सलीम अख्तर, पंडित राजू जावळकर आणि भरत जंगम यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांच्या शिष्य परिवाराला आशीर्वाद देताना फैय्याज हुसेन खानसाहेब म्हणाले की, “गुरुंची शिकवण शिष्यपरिवार अखंडितपणे श्रद्धा आणि निष्ठेने पुढे नेत आहेत, हे विशेष कौतुकास्पद आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *