Headlines

पिंपळवंडी अत्याचार व हत्या प्रकरण:खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – सुनेत्रा पवार




पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवला जावा, अशी विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्या लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्या परिचयातील असून, त्याने मुलीची दिशाभूल करून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची माहिती घेतली. तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी केवळ मुलींमध्ये प्रबोधन पुरेसे नाही, तर गावपातळीवर शासनाच्या यंत्रणा अधिक सक्रिय असणे आवश्यक आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलता, जबाबदार वर्तन आणि महिलांचा सन्मान याबाबत सातत्याने जनजागृती करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *