![]()
पुण्यातील डॉ. दीपमाला पाटील (पीएचडी इन फार्मसी) यांनी ‘फार्माईश’ नावाचे एक तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठ विकसित केले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या परिसरातील परवानाधारक औषध विक्रेत्यांशी जोडणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर औषधे मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच स्थानिक औषध विक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक सक्षम करणे हा यामागील उद्देश आहे, अशी घोषणा डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाचा भाग असलेले ‘फार्माईश’ पुढील महिन्यापासून पुण्यातून आपल्या सेवेला सुरुवात करणार आहे. फार्मसी क्षेत्रातील व्यावसायिक आणि संशोधक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांतून ‘फार्माईश’ची संकल्पना पुढे आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “अनेकदा अडचण औषधांच्या दुकानांची उपलब्धता नसते, तर ग्राहक आणि सेवा देण्यास इच्छुक असलेल्या औषध विक्रेत्यांमध्ये असलेली दरी ही असते.” औषध विक्रेतेही आता डिजिटल माध्यमांचा स्वीकार करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जवळच्या औषध विक्रेत्यांशी जोडणाऱ्या एका सामायिक तंत्रज्ञान व्यासपीठाची गरज होती, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले. यामुळे परिसरातील औषधांचे दुकान कायम ठेवून ग्राहकांसाठी औषध खरेदी अधिक सोयीची होईल. ‘फार्माईश’च्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहक जवळच्या परवानाधारक औषध विक्रेत्यांना प्रिस्क्रिप्शन डिजिटल पद्धतीने पाठवू शकतील. यात डिजिटल अपलोड, प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढणे, व्हॉट्सॲप आणि व्हॉइस असिस्टन्स यांसारख्या विविध पर्यायांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील ग्राहकांना त्याचा सहज वापर करता येणार आहे. ग्राहकाने ‘फार्माईश’वर पाठवलेले प्रिस्क्रिप्शन संबंधित औषध विक्रेता स्वतंत्रपणे तपासेल आणि मागणी पूर्ण करण्याबाबत निर्णय घेईल. औषधे देणे, बिलिंग, पॅकिंग आणि घरपोच वितरणाची संपूर्ण जबाबदारी परवानाधारक औषध विक्रेत्याचीच असेल. ‘फार्माईश’च्या वापरासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, ‘फार्माईश’ हे ई-फार्मसी व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ औषधांची खरेदी, साठवणूक, वितरण किंवा प्रत्यक्ष डिलिव्हरी करत नाही. तसेच औषध लिहून देणे किंवा वैद्यकीय निर्णय घेण्यातही त्याची कोणतीही भूमिका नाही. ‘फार्माईश’ला औषध विक्रीतून कोणताही मार्जिन, कमिशन किंवा नफ्यातील हिस्सा मिळत नाही. त्याचे उत्पन्न मॉडेल किरकोळ औषध विक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एकदाच देय असणारे तंत्रज्ञान व्यासपीठ सहभागी शुल्क आणि प्लॅटफॉर्म वापर शुल्कावर आधारित आहे.
Source link
'फार्माईश' ॲप स्थानिक औषध विक्रेते, ग्राहकांना जोडणार:डॉ. दीपमाला पाटील यांनी विकसित केले व्यासपीठ; औषध खरेदी प्रक्रिया सुलभ होणार