Headlines

टिकली आणते म्हणत तिसऱ्या दिवशीच पळाली ‘लुटेरी दुल्हन”:वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार; 6 जणांविरोधात तक्रार




लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी बाजारात खरेदीसाठी गेलेली नववधू “मी टिकली घेऊन लगेच येते,’ असे सांगून दागिने व रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर भागात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर स्त्रीधन म्हणून दीड लाख रुपये उकळून नवरी, तिची आई व दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा विश्वासघात केला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी घडली. प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. लग्नासाठी दीड लाख रुपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने घेतल्यानंतर नवरी लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी खरेदीच्या बहाण्याने निघून गेल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी संदीप सुभाष रगडे (३३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, तिसगाव) यांनी सहा जणांविरोधात लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रगडे यांचे शेजारी राहणारे बाबासाहेब देवरे यांच्याशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत देवरे यांनी स्वाती देवरे या तरुणीसोबत रगडे यांचा विवाह लावून देण्याचे ठरविले. ११ ऑगस्ट रोजी विवाह ठरला असताना तो न झाल्याने १२ ऑगस्ट रोजी रगडे यांच्या तिसगाव येथील घरी विवाह झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विवाहासाठी संबंधितांनी खर्चाच्या नावाखाली रगडे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, तसेच सुमारे तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे व इतर दागिने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी स्वाती हिच्यासोबत संदीप रगडे हे बजाजनगरात खरेदीसाठी गेले होते. मोहटादेवी मंदिराजवळील एका दुकानातून कपडे व अन्य साहित्य खरेदी केल्यानंतर टिकली घेण्यासाठी जाते असे सांगून नवविवाहिता दुकानाबाहेर गेली. बराच वेळ झाल्यावर त्यांनी बाहेर जाऊन शोध घेतला पण सापडली नाही. तेव्हापासून ती परत आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याचा दावा रगडे यांनी केला आहे. या प्रकरणात बाबासाहेब देवरे, अमोल म्हस्के, नितीन दाभाडे, स्वाती रमेश देवरे, रमेश ज्ञानोबा देवरे व मीराबाई रमेश देवरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. नऊ महिन्यांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती वाळूज परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील एका युवकाला याच पद्धतीने बजाजनगरात जाळ्यात ओढण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर कोर्टात १०० रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून ३ लाख रुपये (१.४५ लाख फोन पे + १.५५ लाख रोख) उकळले गेले. त्यानंतर चारचाकीतून गावी जात असताना पांढऱ्या कारमधून आलेल्या साथीदारांनी गाडी अडवून नववधूला पळवून नेले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *