Headlines

खरीप संकटात, रब्बीची भिस्त परतीच्या पावसावर, विहिरींची पातळीही खालावली




श्रीरामपूर तालुक्यात जून ते ऑगस्टदरम्यान अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन, मका, कापूस यासह विविध पिकांवर पाण्याचा ताण पडला असून, अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. आता खरीप वाचविण्यासाठी तसेच आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त सप्टेंबर-ऑक्टोबरमधील परतीच्या पावसावर राहिली आहे. शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेवर खरीप पिकांची पेरणी केली. जुलैतील रिमझिम पावसामुळे उगवलेल्या पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र, त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा एवढेच चित्र असून, पिके पिवळी पडत आहेत. रोगराई व लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्चही वाढला आहे. पाऊस नसल्याने विहिरींची पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना शक्य होत नाही. चारा मका, घास, ऊस यांसारखी चारा पिकेही धोक्यात आल्याने पुढील काळात दुग्धव्यवसायावरही संकट येण्याची शक्यता आहे. अभ्यासकांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हातचा गेल्यास रब्बीची पेरणीसाठीही परतीच्या पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. तालुक्यात सरासरीच्या केवळ निम्माच पाऊस श्रीरामपूर तालुक्यात सरासरी ३२७ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ १६६.५ मिमी पाऊस झाला आहे. मंडळनिहाय पाऊस : श्रीरामपूर २२३.३ मिमी, बेलापूर १६९ मिमी, उंदीरगाव १६६.५ मिमी, टाकळीभान १३८.९ मिमी, तर कारेगाव १३३.२ मिमी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *