महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ‘गनिमी काव्याने’ मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आज ‘महा एल्गा
.
लक्ष्मण हाके यांचा संताप- आम्ही काय रणगाडे घेऊन चाललोय का?
दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झालेले लक्ष्मण हाके पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हणाले, “आम्ही काय रणगाडे, तोफगोळे घेऊन मुंबईला चाललो आहोत का? की एखादे विमान पाडण्यासाठी चाललो आहोत? आम्ही हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी शांततेत मुंबईला निघालो आहोत. पोलिसांनी त्यांचे काम करावे, गरज पडल्यास त्यांनी आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकावे, लाठीचार्ज करावा किंवा आम्हाला गोळ्या घाला… पण कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिला नाही तरी हे आंदोलन थांबणार नाही.”
ओबीसींचे आरक्षण संपले
हाके यांनी आरोप केला की, “22 लाख 20 हजार 577 कुणबी प्रमाणपत्रे वाटून सरकारने ओबीसींचे आरक्षण संपवले आहे. सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत आता आमदार, खासदार आणि संस्थानिकांनी मागासवर्गीयांचे प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या जागा बळकावल्या आहेत.”
“मुख्यमंत्र्यांची आई-माई काढली तेव्हाच ते दखल घेणार का? ओबीसी आमदार आणि नेते केवळ पक्षाचे गुलाम झाले आहेत. शंभूराज देसाई यांना ओबीसींचे काही देणेघेणे नाही. राजकारण गेले चुलीत, आम्हाला पदाची गरज नाही, पण गावगाड्यातील आणि झोपडपट्टीतील ओबीसींच्या बाजूने आम्ही लढणारच.”

तायवाडे यांचा हाकेंच्या मोर्चाला विरोध; ओबीसी चळवळीत फूट
एकीकडे लक्ष्मण हाके ओबीसींच्या हक्कासाठी मुंबईकडे निघाले असताना, दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तायवाडे म्हणाले, “आम्ही ‘डिमांड बेस ऑर्गनायझेशन’ आहोत. आम्ही जेव्हा सरकारकडे जातो तेव्हा संविधानिक मागण्या घेऊन जातो. लक्ष्मण हाके यांच्या आजच्या मोर्चाच्या मागण्या काय आहेत, हे त्यांनी अद्याप घोषित केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा या मोर्चाला अजिबात पाठिंबा नाही आणि आम्ही त्यात सहभागी होणार नाही.”

संविधानाच्या चौकटीत मागण्या कराव्यात
मनोज जरांगे यांच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनावर बोलताना तायवाडे यांनी जरांगेंना आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. “गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू असल्याने मुंबईत लाखो लोकांची गर्दी असेल, अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागल्यास मोठे प्रकरण उद्भवू शकते. आंदोलकांनी संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत बसणाऱ्याच मागण्या कराव्यात, तरच सरकार त्या पूर्ण करू शकते,” असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची आणि सरकारची पुढची भूमिका काय?
सध्या पुणे-सोलापूर महामार्गावरून यवतच्या टोलनाक्याजवळ पोहोचलेल्या हाके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ठीकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, “इतरांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय हे खपवून घेणार नाही. हजारो गाड्यांचा ताफा मुंबईला धडकणारच आणि १ सप्टेंबरला ओबीसी म्हणजे काय हे आम्ही सरकारला दाखवून देऊ,” असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. आता पोलीस हाकेंचा मोर्चा कसा रोखणार आणि सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एकाच वेळी दोन आंदोलनांची शक्यता; सरकारसमोर मोठे आव्हान
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईकडे मोर्चा काढला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर एकाच वेळी दोन परस्परविरोधी आरक्षणाच्या मागण्यांचे आंदोलन हाताळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हाके यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या मोर्चापासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील विविध संघटनांची भूमिका आगामी काळात काय राहणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. पाटसपासून मुंबईच्या दिशेने सुरू झालेला हा मोर्चा पुढे कुठपर्यंत पोहोचतो, पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते आणि सरकार आंदोलकांशी चर्चा करते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस: जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालवली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. जरांगे पाटलांनी उपचारासाठी नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीकडे सरकारचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनंतरही आंदोलन सुरूच असल्याने सरकारकडून पुढील चर्चेसाठी हालचाली सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी