![]()
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात विविध कामांना वेग आला असताना, कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिसांच्या वाहनाची दुरवस्था समोर आली आहे. पोलिसांची गाडीच भररस्त्यात बंद पडल्याने ती सुरू करण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यात साफसफाईचे काम करणाऱ्या मुलांना धक्का देण्यासाठी बोलवावे लागल्याचा प्रकार घडला. काही मिनिटे गाडीला धक्का दिल्यानंतर वाहन सुरू झाले. मात्र, या प्रकारामुळे कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या वाहन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. नाशिकपासून जवळ असलेल्या इगतपुरी परिसरात कुंभमेळ्याचे उगमस्थान मानले जाणारे कावनई, तसेच कसारा घाट आणि इगतपुरी रेल्वेस्थानक असा महत्त्वाचा परिसर आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी रेल्वेने या भागात येण्याची शक्यता असल्याने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर असणार आहे. अशा परिस्थितीत पोलिसांचे वाहनच रस्त्यात बंद पडत असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यातील या वाहनाची पाहणी केली असता त्याची दुरवस्था स्पष्टपणे दिसून आली. वाहनाचे दोन दरवाजे उघडत नसल्याचे, तर पावसाळ्यात वायपर व्यवस्थित काम करत नसल्याने दोरीच्या सहाय्याने वायपर फिरवावा लागत असल्याचे समोर आले आहे. चालकाच्या बाजूचे सीटही वेल्डिंग करून जोडण्यात आले आहे. त्यामुळे या वाहनातून पोलिसांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. नवीन वाहनासाठी प्रस्ताव सदर वाहन कालबाह्य झाले असून, नवीन वाहन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नरेंद्र खैरनार, प्रभारी अधिकारी, लोहमार्ग पोलिस
Source link
इगतपुरीत लोहमार्ग पोलिसांची गाडी धक्क्यावर:भररस्त्यावर बंद पडले वाहन, साफसफाई करणाऱ्या मुलांच्या मदतीने केले सुरू