![]()
महाराष्ट्रात आज प्रत्येक समाजघटकाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असून राज्य सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील खड्डे, कायदा-सुव्यवस्था, पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला आणि अयोध्या राम मंदिरातील चंदा चोरीच्या आरोपांवरून महायुती व केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून सरकारची टोलवाटोलवी नाशिकमध्ये वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “गेल्या 12 दिवसांपासून ही मुले उपोषणाला बसली आहेत. त्यांच्या मागण्या काही देश हलवणाऱ्या नाहीत, तर वसतिगृह, आश्रमशाळा आणि शिक्षणाच्या अत्यंत मूलभूत सुविधांसंबंधी आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून आणि सरकारकडून केवळ थातूरमातूर आणि टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.” “दुर्दैवाने या सरकारला लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नांपेक्षा कोण शाकाहारी खातो आणि कोण मांसाहारी, यावरच राजकारण करण्यात जास्त रस आहे. कोणी उपाशीपोटी मरत असेल तर भाजप आणि सरकारला त्याचा काहीही फरक पडत नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला शिवसेना (उबाठा) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून, याप्रश्नी आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात बापटांवरील हल्ला अन् संतोष पंडितांच्या मध्यरात्री अटकेवर पुण्यातील घडामोडींवर आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली, “डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट हे कोणत्याही सणाच्या किंवा धर्माच्या विरोधात बोलत नाहीत. आवाजाची मर्यादा काय असावी, यावर चर्चा सुरू असताना अशा प्रकारे भरदिवसा मारहाण होणे हे राज्यातील कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण आहे.” तर संतोष पंडितांच्या अटकेवर ते म्हणाले, “खड्ड्यांपासून ते चुकीच्या नंबर प्लेटपर्यंत कायद्याचे पालन कसे व्हावे हे दाखवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला (संतोष पंडित) मध्यरात्री १ वाजता घरात घुसून अटक केली जाते. अशा साध्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही उद्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) पाठवणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अयोध्येत नवीन सीईओची नियुक्ती म्हणजे ‘चंदा चोरी’ची कबुली अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) नियुक्ती झाल्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजपला घेरले. “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. आता तिथे नवीन सीईओ आणण्याची वेळ का आली? याचा अर्थ मंदिरात ‘दान आणि चंदा चोरी’ झाल्याचे सरकारने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.” “नृपेंद्र मिश्रा आणि चंपत राय यांची नेमणूक कोणी केली होती? देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी भाजपने प्रतारणा केली असून हा भाविकांच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार आहे.” राज्यातील महामार्ग, खड्डे अन् दरोड्यांवर आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई-नाशिक महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठाण्यातील कोपरी पुलाचे उद्घाटन होऊन दोन वर्षेही झाली नाहीत, तोच तिथे अर्धा फूट खोल खड्डे पडले आहेत. समृद्धी महामार्गावर एकही स्लॅब व्यवस्थित नाही, उलट आता समृद्धीवर खुलेआम दरोडे पडायला लागले आहेत.” “पुढील काळात सुपर ‘अल निनो’चा धोका वर्तवला जात असून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शेतीचे उत्पादन घटल्यावर काय करायचे किंवा शहरांना पाणी कसे द्यायचे, यावर मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही नियोजन नाही; ते फक्त एकमेकांना खाली खेचण्याच्या राजकारणात व्यस्त आहेत.” अमित ठाकरेंवरील कारवाई आणि व्हीआयपी कल्चरवर निशाणा अमित ठाकरे यांच्यावर दोन तासांत गुन्हा दाखल होणे आणि अजित पवारांच्या विमान अपघातावर अद्याप एफआयआर न होणे, यावर विचारले असता ते म्हणाले, “अमित ठाकरेंवर अनाधिकाराने प्रवेश (ट्रेसपासिंग) केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पण २०२६ च्या उंबरठ्यावर असताना अजूनही शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो लावण्याची गरज आहे का? हे व्हीआयपी कल्चर आता बंद झाले पाहिजे.” “मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आणि लाडक्या बहिणी… आज राज्यातील प्रत्येक घटक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. २०० आमदारांचे बहुमत असूनही जर जनतेचे मूलभूत प्रश्न सुटत नसतील, तर हे सरकार नक्की कोणासाठी चालवले जात आहे?” असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. हेही वाचा… पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: वडेट्टीवार, पवार, अंधारेंकडून संताप व्यक्त; पोलिस संरक्षणाची मागणी पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
उपाशी मरणाऱ्यांपेक्षा कोण काय खातं यावरच सरकारचं लक्ष:आदित्य ठाकरेंचा नाशिकमधून हल्लाबोल, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा