टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक आणि रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. “माझ्यावर झालेला भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. नरेंद्र दाभोलकरांसारख्या
.
मी कोण हा मुद्दा नाही, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या!
बापट हे मूळचे पुणेकर नसल्याच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “मी कुठला आहे किंवा कोण आहे, हा मुद्दाच नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला मूळ विषयाचा तार्किक प्रतिवाद करता येत नाही, तेव्हा तो अशा पळवाटा शोधतो. यालाच तर्कामध्ये ‘ॲड हॉमिनेम’ (Ad Hominem) फॅलसी म्हणतात.”
“सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना कर्णकर्कश ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी नागरिकांवर लादली जाते. हा सर्वसामान्य पुणेकरांना होणारा थेट उपद्रव आहे आणि त्यावर बोलण्याचा प्रत्येक करदात्या नागरिकाला घटनादत्त अधिकार आहे.”
डीजेचे समर्थन म्हणजे सुपारी किलिंगला रोजगार म्हणण्यासारखे; हा ‘सॉफ्ट व्हायलन्स’
डीजे व्यवसायावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून असल्याच्या दाव्याचा बापट यांनी अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला. “मुंबईत 92-93च्या काळात अंडरवर्ल्ड टोळ्या सुपारी घेऊन खून करायच्या. तो त्यांचा रोजगार होता म्हणून सरकारने त्यांना खून करू द्यायचे का? हाताने ओढायच्या रिक्षा, टांगे किंवा मानवी विष्ठा उचलण्याची (Manual Scavenging) अनिष्ट प्रथा कायद्याने बंद झाली, तेव्हाही रोजगार बुडत होता. ज्या व्यवसायामुळे लाखो नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, तो व्यवसाय कायदेशीर किंवा तार्किकदृष्ट्या चालू ठेवताच येत नाही.”
सॉफ्ट व्हायलन्सची उपमा
“ज्याप्रमाणे बेडकाला थंड पाण्यात टाकून हळूहळू पाणी उकळले जाते, तसा हा ‘सॉफ्ट व्हायलन्स’ आहे. उत्सवाच्या नावाखाली निर्माण झालेली ही दहशत सहन करण्यापलीकडे गेली आहे. तुम्हाला गाणी किंवा वाद्ये वाजवायची असतील तर ती बंदिस्त प्रेक्षागृहात वाजवा, सार्वजनिक रस्त्यांवर नागरिकांना वेठीस का धरता?” असा सवाल त्यांनी केला.

भावना दुखणे म्हणजे पोट किंवा डोके दुखणे नव्हे; हा कांगावा
आपल्या भूमिकेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या आरोपांवर ते म्हणाले, “भावना दुखणे म्हणजे डोके, छाती किंवा पोट दुखणे नव्हे. समोरच्या मताला तार्किक उत्तर देता येत नसल्यावर लहान मुलासारखा केलेला हा निव्वळ कांगावा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायद्याचे संरक्षण आहे.”
“सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून नागरिकांना ‘सक्तीचे श्रोते’ बनवण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. लंडन, न्यूयॉर्क किंवा म्युनिकसारखे विमानतळ आज सायलेंट झोन झाले आहेत; मग आपल्याकडे रस्त्यावर इतका गोंगाट कशासाठी?”
‘घटं भिन्द्यात्…’ चा पुनरुच्चार अन् स्वसंरक्षणाचा अधिकार
आपल्यावरील हल्लेखोराच्या मानसिकतेवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा चर्चित सुभाषिताचा उल्लेख केला: “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्” (मडके फोडावे, वस्त्र फाडावे किंवा गाढवावर बसावे; पण कोणत्याही मार्गाने प्रसिद्ध व्हावे). मुद्द्यांना उत्तर देण्याची ताकद नसलेले समाजकंटक केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अशा हिंसक कारवाया करतात, असा टोला त्यांनी लगावला.
स्वसंरक्षणाचा हक्क
अमेरिकेच्या संविधानातील ‘सेकंड अमेंडमेंट’चा दाखला देत ते म्हणाले, “प्रत्येक सुजाण नागरिकाला स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा अधिकार असायला हवा. कोयता गँग रस्त्यावर फिरून शस्त्रांचे प्रदर्शन करते, तर सुजाण माणूस आत्मसंरक्षणासाठी कायदेशीर शस्त्र बाळगू शकतो, या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत.”
लढा संघटनात्मक पातळीवर नेणार; रविवारी गुडलक चौकातून मोर्चा
नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्यावर बोलताना बापट यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ध्वनिप्रदूषण आणि नागरी समस्यांविरोधात यापुढील काळात ‘सिटीझन ॲक्टिव्हिझम’ला संघटनात्मक स्वरूप देण्याचा विचार असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. रविवारी डेक्कन येथील गुडलक चौकापासून महापालिकेवर पुणेकरांचा भव्य मोर्चा निघणार आहे. हजारो सजग नागरिक यात सहभागी होत असून, प्रकृती साथ देईल तोपर्यंत आपण स्वतः या मोर्चात अग्रभागी असू, असे त्यांनी सांगितले.
नास्तिकतेवर स्पष्टोक्ती
गणेश मंडळाने डीजे, ढोल-ताशे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्यास त्या मंडळाच्या आरतीला आपण जाणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. बापट यांनी सांगितले की, एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मंडप रस्त्यावर अतिक्रमण करत नसल्याचे आणि ध्वनिक्षेपक किंवा ढोल-ताशांचा वापर करत नसल्याचे सांगितले. त्यांनी या भूमिकेचे स्वागत केले.
मात्र त्या मंडळाने आरतीला बोलावल्यास आपण जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी नास्तिक आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालो तर माझ्या नास्तिकतेच्या भूमिकेला अर्थ राहणार नाही,” असे त्यांनी सांगितले. मात्र एखाद्या मंडळाने स्वेच्छेने ध्वनी प्रदूषण टाळण्याचा निर्णय घेणे ही स्वागतार्ह बाब आहे. सर्व मंडळांनी अशाच पद्धतीने निर्णय घेतला तर हा प्रश्न आपोआप सुटू शकतो, असेही ते म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर हरकत नाही, पण त्यासाठी नियोजन नाही’
नागपुरात डीजे आणि लेझरवर बंदीचा निर्णय झाल्यानंतर पुण्यातही तशाच प्रकारचा निर्णय व्हावा, अशी मागणी बापट यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पुण्यात असल्याने त्यांची भेट घेणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही नियोजित भेट नसल्याचे सांगितले. “मुख्यमंत्र्यांची भेट झाली तर माझी काही हरकत नाही. पण एखाद्या व्यक्तीची भेट घेण्यापेक्षा नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढला तर प्रश्न आपोआप सुटतात. सोलापूरमध्ये नागरिकांच्या सक्रियतेमुळे हा मुद्दा सुटला,” असे बापट म्हणाले.
मुख्यमंत्री किंवा केंद्रातील मंत्र्यांना पत्र लिहिण्याबाबतही त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातील महापालिका बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयासह अनेकांना ई-मेलद्वारे आपली भूमिका कळवली आहे. स्थानिक लोकसभा, राज्यसभा आणि नगरसेवकांनाही लेखी पत्रे दिली आहेत. आता माध्यमांमधून हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्याने पुन्हा पत्र लिहिण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ल्यानंतर काळा कपडा घातला
काल झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज काळा कपडा परिधान केल्याचेही बापट यांनी सांगितले. मात्र हल्ल्यानंतरही डीजेविरोधातील आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नागरिकांचा प्रश्न केवळ डीजेपुरता मर्यादित नसून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण, वाहतुकीचे अडथळे, पर्यावरण आणि नागरिकांच्या शांततेचा अधिकार यांच्याशी संबंधित आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून मत मांडणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. हल्ल्यानंतरही बापट यांनी रविवारी प्रस्तावित मोर्चात सहभागी होण्याची भूमिका जाहीर केल्याने डीजेविरोधातील आंदोलनाला आता आणखी व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…
डीजेच्या आवाजामुळे सणाचे गांभीर्य जाते; बापटांवरील हल्ला लोकशाहीवर: पोलिस आयुक्त अन् राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे- शरद पवार

विद्यानंद बापट यांना मी काही ओळखत नाही, पण ते जे काही बोलत आहेत त्याला अर्थ आहे. कुठलाही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्य निघून जाते, कोणी मत व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर हा हल्ला माझ्यामते लोकशाही आणि मूलभूत अधिकारावर आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी