Headlines

केतन अग्रवाल खून प्रकरणात रितेश हंगेला अटक:खुनाआधी-नंतर आरोपींच्या संपर्कात होता, 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी




पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी रितेश हंगेला अटक करण्यात आली आहे. खुनाच्या आधी आणि नंतरही रितेश हा आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संपर्कात होता. त्याने पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली नाही, उलट ती लपवून ठेवली. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गिल यांनी सांगितले की, रितेशचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग स्पष्ट झाला आहे. त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फॉरेन्सिक विश्लेषण आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रितेशविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी रितेश, सिया आणि चेतन यांच्यातील डिलीट केलेले चॅटिंगही मिळवले आहे. यातून पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. रितेशला गुन्हा घडण्यापूर्वी सर्व घटना माहीत होती. चेतनने गुन्ह्याबाबत रितेशसोबत अनेकदा चर्चा केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हा घडला तेव्हा रितेश घटनास्थळी हजर होता की नाही, याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी लोहगड किल्ल्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. चेतन आणि रितेश हे महाविद्यालयात एकत्र शिकले आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान अनेक जबाबांमध्ये रितेशचे नाव समोर आले होते. तांत्रिक पुरावेही मिळाले होते. चेतननेही रितेशबद्दल माहिती दिली आहे. आरोपी अपूर्ण माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्यास, पोलिस त्यांच्या पद्धतीने माहिती काढून पुढील तपास करतात. कलम ६१(२) नुसार, गुन्ह्याची माहिती असणे आणि गुन्ह्याच्या कटात सहभागी असणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. चेतनने गुन्हा केल्यानंतर तो रितेशला भेटला होता आणि त्याला गुन्ह्याबद्दल सांगितले होते. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, गुन्हा करण्यापूर्वी चेतन, रितेश आणि सिया यांनी बाहेरील व्यक्तींना कटात सहभागी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर त्यांनी तो कट रद्द करून स्वतःच गुन्हा केला. कॉन्ट्रॅक्ट किलिंगसाठी आरोपी प्रयत्न करत असताना रितेश कटात सक्रिय सहभागी होता. रितेश लोहगड किल्ल्यावर कधी गेला होता का, याबाबतही तपास सुरू आहे. रितेश एका खासगी बांधकाम व्यावसायिक ठिकाणी नोकरी करतो. सध्या या तीन आरोपींशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग दिसून आलेला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *