Headlines

पाच दिवसांचा आठवडा, पीएलआय निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:संभाजीनगरात एकदिवसीय लाक्षणिक संप; मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप




युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने गुरुवारी (११ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आणि पीएलआय (Performance Linked Incentive) बाबतचा भेदभावपूर्ण निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. बँक ऑफ इंडिया, जालना रोड येथे झालेल्या या आंदोलनात सुमारे ८०० हून अधिक बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते, ज्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. निदर्शनाच्या सुरुवातीला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे कॉम्रेड कैलास कानडे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. एनसीबीईचे ललित निकुंभ, एआयबीओसीचे गणेश तायडे व अमोल गायके, एनसीबीओचे दिगंबर हरकळ आणि एआयबीओएचे निलेश खरात यांनीही उपस्थितांना संबोधित केले. बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. मनुष्यबळाची मोठी कमतरता, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा अतिरिक्त भार आणि वाढत्या अपेक्षांमुळे त्यांच्या आरोग्यावर व कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते, ज्यामुळे त्यांची मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचे संघटनांनी सांगितले. केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, आरबीआय, नाबार्ड आणि एलआयसीमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. बँक व्यवस्थापन आणि संघटनांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत द्विपक्षीय करार झाला आहे. मात्र, वित्त मंत्रालयाकडून आवश्यक मंजुरी न मिळाल्याने हा निर्णय रखडला आहे. याशिवाय, पीएलआयबाबत संघटनांशी कोणतीही चर्चा न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा निर्णय द्विपक्षीय कराराच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ११ सप्टेंबरचा हा लाक्षणिक संप सरकारसाठी एक स्पष्ट इशारा आहे. जर सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही दिला आहे. या आंदोलनात सचिन देशपांडे, प्रणव कौशिके, मारुती निकम, पियुष बिऱ्हाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र देवळे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *