Headlines

बाप्पासमोर उद्योगविश्वाचा संकल्प; ‘पृथ्वी वाचवूया’चा दिला संदेश, पॉलीमिक्ट ग्रूपचा‎पर्यावरणपूरक उत्सव‎




‘आपली पृथ्वी वाचवूया’ हा संकल्प घेऊन अहिल्यानगर एमआयडीसीमधील पॉलीमिक्ट ग्रूपने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला आहे. कंपनी कॅम्पसमध्ये साकारण्यात आलेला आकर्षक देखावा केवळ गणेशोत्सवाची सजावट न राहता उद्योग क्षेत्राने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा आणि शाश्वत उत्पादनाचा विचार कृतीत आणण्याचा संदेश देत आहे. उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार, संसाधनांचा योग्य वापर, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाचे महत्त्व या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा विचार केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता कंपनीच्या कार्यपद्धतीतही त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. ‘पुढील ५० वर्षांसाठी पृथ्वी टिकवायची असेल, तर आजपासून उद्योगांनी शाश्वत उत्पादनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला. प्रत्येक कंपनीने उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे संरक्षण शक्य होईल, हा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे. हा विचारप्रवर्तक देखावा साकारण्यासाठी पॉलीमिक्टच्या टीमने सर्जनशीलता, कौशल्य आणि टीमवर्कचा प्रभावी वापर केला. मनीष अकोलकर, हर्ष राजगुरू, अथर्व पिंगे, धनश्री बारस्कर, आर्या हराळे, सम्राट मुरकुटे, संभाजी नवले, चांगदेव साठे, वीणा तट्टू यांच्यासह टीममधील अनेक सदस्यांनी योगदान दिले. या उपक्रमासाठी व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र सुखटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय सुखटणकर तसेच सिनियर मॅनेजमेंट टीमचे मार्गदर्शन लाभले. उत्सवातून पर्यावरणाचा विचार आणि विचारातून शाश्वत उत्पादनाची कृती असा संदेश देणारा हा उपक्रम उद्योगनगरीत चर्चेचा विषय ठरला आहे. गणेशोत्सवाच्या आनंदासोबत पर्यावरणाप्रती उद्योगांची जबाबदारीही अधोरेखित करणारा हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *